
गोंदिया : रावणवाडी पोलिस ठाण्यांतर्गत ग्राम हलबीटोला-सावरी शेतशिवारात युवकाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (दि. १०) दुपारी १२:३० वाजता उघडकीस आली आहे. मृत युवकाचे नाव शिवदास रतीराम कवास (४५, रा. हलबीटोला) असे आहे.
फिर्यादी गिरधारी मोहन कवास (३५, रा. हलबीटोला-सावरी) यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, शुक्रवारी (दि. ९) दुपारी २ वाजताच्या दरम्यान शिवदास दारूच्या नशेत शेताकडे गेला. मात्र, सायंकाळी घरी परत आला नाही. त्याचा मुलगा रोहित वडिलांचा शोध घेण्यासाठी शेतीत गेला असता तो सापडला नाही. शनिवारी (दि. १०) दुपारी १२:३० वाजता पुन्हा शोध घेताना शिवदासचा मृतदेह शेतात धुराच्या कडेला असलेल्या चिंचेच्या झाडाला नायलॉनच्या दोराने गळफास लावून लटकलेल्या स्थितीत आढळला.
याबाबत रावणवाडी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक वैभव पवार यांच्या मार्गदर्शनात हवालदार पंकज सव्वालाखे तपास करीत आहेत.



