
भंडारा : वाढते रस्ते अपघात रोखण्यासाठी आणि नागरिकांमध्ये रस्ता सुरक्षेबाबत जाणीव निर्माण करण्यासाठी बुधवारी (दि.१४) उप प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO), भंडारा यांच्या वतीने शहरात भव्य ‘हेल्मेट जनजागृती रॅली’ काढण्यात आली. “रस्ता सुरक्षा – जीवन रक्षा” हा प्रभावी संदेश देत निघालेल्या या रॅलीने संपूर्ण शहराचे लक्ष वेधून घेतले.
ही रॅली उप प्रादेशिक परिवहन कार्यालयापासून सुरू होऊन शहरातील मुख्य चौक आणि बाजारपेठेतून मार्गस्थ झाली. दुचाकीवर हेल्मेट घालून सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांनी आणि नागरिकांनी सुरक्षित प्रवासाचे आवाहन केले. ठिकठिकाणी शहरातील नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करत रस्ता सुरक्षेचा संकल्प केला.
रॅलीचे नेतृत्व उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सतीश जाधव आणि जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक जितेंद्र बोरकर यांनी केले. या मोहिमेत मोटार वाहन निरीक्षक वैभव गुल्हाणे, सुहास ठोंबरे, शेखर आचार्य, सहाय्यक निरीक्षक सागर सराफ, अनिल ढोले, गुलशनकुमार चौरे, मेघाराणी काशिद आणि आरटीओ कार्यालयातील सर्व कर्मचारी सहभागी झाले होते. विशेष म्हणजे, *’MH36 भंडारा रायडर्स क्लब’*च्या सदस्यांनीही मोठ्या संख्येने सहभागी होऊन या मोहिमेला बळ दिले.
रॅली दरम्यान ध्वनिक्षेपकाद्वारे नागरिकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले. “तुमचे कुटुंब तुमची वाट पाहत आहे, त्यामुळे दुचाकी चालवताना हेल्मेट आणि चारचाकी चालवताना सीटबेल्टचा वापर अनिवार्य करा,” असे भावनिक संदेश देण्यात आले. वेग मर्यादेचे पालन करणे आणि वाहन चालवताना मोबाईल टाळणे यावर विशेष भर देण्यात आला.
कार्यक्रमाच्या सांगता प्रसंगी एक स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. रस्ता सुरक्षेला प्रोत्साहन देण्यासाठी नागरिकांना मोफत हेल्मेटचे वाटप करण्यात आले. हे हेल्मेट ‘ए. के. गांधी TVS, भंडारा’ यांच्या वतीने प्रायोजित करण्यात आले होते. या भव्य रॅलीमुळे भंडारा शहरात रस्ता सुरक्षेबाबत एक सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून, नियमांचे पालन करण्याबाबत नागरिकांमध्ये जागृती निर्माण झाली आहे.
“एका क्षणाची बेफिकिरी संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करू शकते. त्यामुळे वेगावर नियंत्रण ठेवा आणि जीव वाचवा. महिनाभर अशाच विविध उपक्रमांद्वारे रस्ते अपघात शून्यावर आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.”
– सतीश जाधव, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, भंडारा.



