
प्रशासनाच्या खोट्या अहवालामुळे कामगार आक्रमक, गेटसमोरच ठिय्या
भंडारा : वरठी येथील सनफ्लॅग आयर्न अँड स्टील कंपनीत शनिवारी (दि. १७) एका भीषण अपघातात क्रेन ऑपरेटरचा जागीच मृत्यू झाला. मात्र, कंपनी प्रशासनाने मृत्यूबाबत चुकीची माहिती दिल्याचा आरोप करत संतप्त कामगार आणि नातेवाईकांनी मृताचा देह कारखान्याच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर ठेवून जोरदार ‘चक्काजाम’ आंदोलन केले. यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
पाचगाव येथील रहिवासी मारोती भिवगडे (४४) हे सनफ्लॅग कंपनीत क्रेन ऑपरेटर म्हणून कार्यरत होते. शनिवारी सकाळच्या पाळीत कर्तव्यावर असताना, सकाळी १० वाजेच्या सुमारास त्यांचा अचानक तोल गेला आणि ते उंचावरून खाली कोसळले. या अपघातात गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. मारोती भिवगडे हे कुटुंबातील एकमेव कमावते व्यक्ती होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार असून या घटनेने पाचगाव गावावर शोककळा पसरली आहे.
घटनेनंतर कंपनी प्रशासनाने मारोती यांचा मृत्यू उपचारादरम्यान झाल्याचा अहवाल दिला. हा अहवाल वस्तुस्थितीला धरून नसल्याचा आरोप करत कामगार आणि ग्रामस्थ संतापले. “जागीच मृत्यू झालेला असताना प्रशासन माहिती का लपवत आहे?” असा सवाल करत आंदोलकांनी व्यवस्थापनाला धारेवर धरले आणि जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत मृतदेह न उचलण्याचा पवित्रा घेतला.
घटनेची माहिती मिळताच आमदार राजू कारेमोरे यांनी तातडीने कारखाना गाठले. त्यांनी संतप्त ग्रामस्थांच्या भावना जाणून घेतल्यानंतर कंपनी व्यवस्थापनासोबत सविस्तर चर्चा केली. यावेळी नागरिकांचा रोष इतका तीव्र होता की पोलीस आणि व्यवस्थापनाला त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना कसरत करावी लागली.
आमदार कारेमोरे यांच्या मध्यस्थीनंतर व्यवस्थापनाने नमते घेतले. मृताच्या कुटुंबाला २ लाख रुपयांची तातडीची मदत देण्यात आली असून, उर्वरित नुकसान भरपाई नंतर देण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले. या आश्वासनानंतर आंदोलकांनी आपला पवित्रा मागे घेतला आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हलविण्यात आला.
हा अपघात अत्यंत दुर्दैवी आहे. कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पीडित कुटुंबाला पूर्ण न्याय मिळेपर्यंत पाठपुरावा करण्याचे आश्वासन आमदार राजू कारेमोरे यांनी दिले. वरठी पोलिसांनी या प्रकरणाची नोंद केली असून, अपघाताला कारखान्यातील निष्काळजीपणा कारणीभूत आहे का, या दिशेने तपास सुरू केला आहे.



