चंद्रपूरविदर्भ

बिबट्याशी दोन हात करून जीव वाचवला, पण वनविभागाच्या असंवेदनशील कारभारामुळे युवकाचे हाल!

कळमना बेघरवस्तीतील थरार ; जखमी युवकाला १६ तास उपचाराची प्रतीक्षा ; वनकर्मचाऱ्यांची संतापजनक वागणूक

बल्लारपूर : तालुक्यातील कळमना बेघरवस्ती परिसरात बिबट्याच्या हल्ल्याची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नितेश सुभाष शेंडे (३२) या युवकाने मृत्यूच्या दाढेतून स्वतःची सुटका करून घेतली, मात्र त्यानंतर वनविभागाच्या असंवेदनशील कारभारामुळे त्याला प्रचंड मानसिक व शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागले. या घटनेमुळे परिसरात वनविभागाविरोधात संतापाची लाट उसळली आहे.

१६ जानेवारी रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास नितेश घराबाहेर शौचास गेला असता, दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर अचानक झडप घातली. जीवघेण्या संकटात घाबरून न जाता नितेशने बिबट्याशी दोन हात केले. त्याने केलेल्या आरडाओरडमुळे गावकरी धावून आले आणि बिबट्याने जंगलात पळ काढला. या हल्ल्यात नितेश गंभीर जखमी झाला.

हल्ल्यानंतर कळमना उपक्षेत्रातील कार्यालयात किंवा निवासात एकही वनकर्मी उपस्थित नव्हता. परिणामी, गंभीर जखमी नितेश रात्रभर वेदनेने तडफडत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी माहिती देऊनही वनविभागाची यंत्रणा हलायला दुपारी २ वाजले. तब्बल १६ तासांच्या विलंबानंतर त्याला बल्लारपूर ग्रामीण रुग्णालय आणि त्यानंतर चंद्रपूर सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले.

जखमी नितेशसोबत असलेल्या त्याच्या बहिणीने जेव्हा उशिरा होणाऱ्या उपचारांबाबत संताप व्यक्त केला, तेव्हा वनकर्मचाऱ्यांनी सहानुभूती दाखवण्याऐवजी अत्यंत उद्धट उत्तर दिले. “तुझ्याजवळ पैसे असतील तर तूच उपचार कर, आमच्याकडे पैसे नाहीत,” अशा शब्दांत कर्मचाऱ्यांनी आपली जबाबदारी झटकली. थातूरमातूर उपचार करून त्याला घरी सोडून देण्याच्या प्रयत्नामुळे वनविभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वनाधिकारी राजेंद्र घोरुडे यांनी नागरिकांना रात्रीच्या वेळी खबरदारी घेण्याचे आवाहन केले असले, तरी प्रत्यक्ष गस्त वाढवण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत. जखमी नितेश शेंडे याला तातडीने आर्थिक मदत व योग्य मोबदला मिळावा. कर्तव्यात कसूर करणाऱ्या आणि रुग्णाशी उद्धट वर्तन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी. परिसरात बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाने तात्काळ गस्त सुरू करावी. इत्यादी मागण्या ग्रामस्थांनी केल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button