गडचिरोलीमहाराष्ट्रमुंबईविदर्भ

गडचिरोलीच्या लेकीची मुंबईत ‘उंच उडान’! ; टाटा मॅरेथॉनमध्ये 21 किमी गटात प्रियंका ओक्सा द्वितीय

पोलीस दलाच्या ‘प्रोजेक्ट उडान’ला मोठे यश; दुर्गम भागातील १८ युवकांनी गाजवले मुंबईचे रस्ते

गडचिरोली : मुंबईच्या रस्त्यांवर धावणाऱ्या हजारो स्पर्धकांमध्ये गडचिरोलीच्या जिद्दीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. गडचिरोली पोलीस दलाच्या ‘प्रोजेक्ट उडान’ अंतर्गत मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या प्रियांका ओक्सा हिने २१ किमी हाफ मॅरेथॉनमध्ये (१८ ते २४ वयोगट) द्वितीय क्रमांक पटकावून जिल्ह्याचा गौरव वाढवला आहे. परदेशी आणि राष्ट्रीय स्तरावरील मातब्बर धावपटूंचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत गडचिरोलीच्या आदिवासी युवकांनी आपली मोहोर उमटवली आहे.

प्रियंका ओक्सा हिने संपूर्ण महिलांमध्ये चौथा क्रमांक व पूर्ण हाफ मॅरेथॉनमधील एकूण स्पर्धकांमध्ये 53 वा क्रमांक पटकाविला आहे. तसेच कार्तिक भांडेकर याने 18 ते 24 या वयोगटात 21 किमीमध्ये 1 तास, 39 मी. 3 सेकंदमध्ये मॅरेथॉन पूर्ण करुन 19 वा क्रमांक, तर संदीप उसेंडी याने 25 ते 29 या वयोगटात 1 तास 39 मी. 5 सेकंदमध्ये मॅरेथॅान पूर्ण करून 22 वा क्रमांक पटकाविला आहे.

गडचिरोली पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या संकल्पनेतून आणि अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी. यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यतील दुर्गम भागातील क्रीडा गुणवत्तेला वाव देण्यासाठी ‘प्रोजेक्ट उडान’ राबवले जात आहे. जिल्ह्यातील ६८ पोलीस स्टेशन आणि उपकेंद्रांमधून कडक चाचणीद्वारे १८ उत्कृष्ट युवक-युवतींची निवड करण्यात आली. निवड झालेल्या खेळाडूंना ट्रॅकसुट, शूज आणि आवश्यक सर्व क्रीडा साहित्य पोलीस दलातर्फे मोफत देण्यात आले. तज्ज्ञ प्रशिक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक जांगी यांच्या देखरेखीखाली या युवकांनी महिनोंमहिने सराव केला होता.

केवळ युवकच नव्हे, तर त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी गडचिरोली पोलीस दलाचे अधिकारी आणि अंमलदारही मॅरेथॉनमध्ये धावले. यामध्ये सपोनि गंगाधर गायकवाड, मपोअं टिंकू चलाख, पोअं मडावी आणि प्रशिक्षणार्थी श्रेयस वाढई यांच्यासह अनेक खेळाडूंनी २१ किमीचे अंतर यशस्वीरीत्या पूर्ण केले.

पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी सर्व विजेत्यांचे अभिनंदन करताना सांगितले की, “दुर्गम भागातील युवकांना योग्य संधी आणि प्लॅटफॉर्म मिळाला, तर ते आंतरराष्ट्रीय स्तरावरही चमकू शकतात. ‘प्रोजेक्ट उडान’चा उद्देशच हा आहे की, इथल्या गुणवत्तेला मुख्य प्रवाहातील मोठ्या स्पर्धांची ओळख करून देणे.”

या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी अपर पोलीस अधीक्षक एम. रमेश, कार्तिक मधिरा, नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी पोउपनि. चंद्रकांत शेळके आणि त्यांच्या संपूर्ण टीमने अहोरात्र परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button