गडचिरोलीविदर्भ

गोंडवाना विद्यापीठाचा १३ वा दीक्षांत समारंभ २१ जानेवारीला

डॉ. अभय बंग करणार दीक्षांत भाषण ; ९६ संशोधकांना ‘आचार्य‘ पदवी तर ३९ विद्यार्थ्यांना सुवर्णपदके प्रदान केली जाणार

गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाचा १३ वा दीक्षांत समारंभ बुधवार, २१ जानेवारी रोजी सकाळी ११:३० वाजता विद्यापीठाच्या नवीन सांस्कृतिक सभागृहात अत्यंत दिमाखात पार पडणार आहे. या सोहळ्यात विविध विद्याशाखांमधील गुणवंत विद्यार्थ्यांना पदव्या आणि सुवर्णपदके देऊन गौरविण्यात येणार असल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली आहे.

या दीक्षांत समारंभाच्या अध्यक्षस्थानी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून गडचिरोली येथील ‘सर्च’ (SEARCH) संस्थेचे संस्थापक तथा ख्यातनाम समाजसेवक डॉ. अभय बंग उपस्थित राहणार असून ते दीक्षांत भाषण करतील. विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे यांची यावेळी विशेष उपस्थिती असेल. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण यांनी सर्वांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. यावर्षी विद्यापीठाच्या चारही विद्याशाखांमधून एकूण ९६ विद्यार्थ्यांना आचार्य (Ph.D.) पदवी प्रदान करण्यात येणार आहे.

आचार्य पदवीचे विद्याशाखा निहाय विद्यार्थी

मानव विज्ञान विद्याशाखा: ४३ विद्यार्थी,  विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखा: ३४ विद्यार्थी, वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्याशाखा: १५ विद्यार्थी, आंतरविद्याशाखीय विद्याशाखा: ०४ विद्यार्थी

या सोहळ्यात एकूण ३९ विद्यार्थ्यांना सुवर्णपदके आणि एका विद्यार्थ्याला रजत पदक, अशी एकूण ४० पदके प्रदान केली जाणार आहेत. यामध्ये मुलींनी बाजी मारली असून वैष्णवी संजय थेरकर: (नेवाजाबाई हितकरणी महाविद्यालय, ब्रह्मपुरी) – वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्याशाखा. जादा रबिया रियाज: (राष्ट्रपिता महात्मा गांधी आर्ट अँड सायन्स कॉलेज, नागभीड) – विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखा. या दोन विद्यार्थिनींनी प्रत्येकी तीन सुवर्णपदके पटकावली आहेत.

विद्याशाखानिहाय सुवर्ण पदके

मानव विज्ञान: २३ सुवर्णपदके, विज्ञान आणि तंत्रज्ञान: ८ सुवर्णपदके, वाणिज्य आणि व्यवस्थापन: ५ सुवर्णपदके, आंतरविद्याशाखीय: ३ सुवर्णपदके

या सोहळ्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, ग्रामीण भागातील व्यसनाधीनतेवर आधारित ‘स्पार्क’ (Social Programme on Addiction in Rural Community) या विशेष अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनाही यावेळी पदविका प्रदान करण्यात येणार आहेत. या सोहळ्याला अधिसभा, व्यवस्थापन परिषद आणि विद्या परिषदेचे सदस्य, दानदाते तसेच विविध प्राधिकरणांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशाचा हा गौरव सोहळा पाहण्यासाठी शिक्षण क्षेत्रात मोठी उत्सुकता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button