भंडाराविदर्भ

सिकलसेलमुक्त जिल्ह्यासाठी अरुणोदय अभियानाचा जागर!

जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाचा संयुक्त पुढाकार; ० ते ४० वयोगटातील नागरिकांच्या तपासणीवर भर

भंडारा : जिल्ह्यात सिकलसेल ॲनिमिया या अनुवांशिक आजाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आणि नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागातर्फे ‘अरुणोदय सिकलसेल ॲनिमिया विशेष अभियान’ प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. ग्रामीण आणि आदिवासी भागातील नागरिकांच्या आरोग्यासाठी हे अभियान एक सुरक्षा कवच ठरत आहे.

या अभियानांतर्गत प्रामुख्याने शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थी, गर्भवती महिला तसेच ० ते ४० वयोगटातील सर्व नागरिकांची सिकलसेल तपासणी करण्यात येत आहे. जिल्ह्यातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे आणि गावपातळीवर विशेष आरोग्य शिबिरे आयोजित केली जात आहेत. या ठिकाणी केवळ मोफत तपासणीच नाही, तर तज्ज्ञांमार्फत समुपदेशन आणि आवश्यक औषधोपचारांची सुविधाही उपलब्ध करून दिली जात आहे.

सिकलसेल हा अनुवांशिक आजार असल्याने त्याचे वेळेवर निदान होणे अत्यंत आवश्यक आहे. हे महत्त्व पटवून देण्यासाठी आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन जनजागृती केली जात आहे. आजाराची लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाय आणि लग्नापूर्वी ‘सिकलसेल कुंडली’ (तपासणी अहवाल) जुळवण्याचे महत्त्व नागरिकांना पटवून दिले जात आहे.

जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी नागरिकांना या मोहिमेत उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. “सिकलसेल ॲनिमियावर वेळीच उपचार मिळाल्यास त्याचे गंभीर दुष्परिणाम टाळता येतात. ‘सिकलसेलमुक्त भंडारा’ हे आमचे ध्येय असून ‘अरुणोदय’ अभियान हे त्या दिशेने उचललेले एक क्रांतिकारी पाऊल आहे. नागरिकांनी आपली व आपल्या मुलांची तपासणी करून प्रशासनाला सहकार्य करावे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button