गडचिरोलीविदर्भ

पोटफोडी नदीजवळील पुलाचे व रस्त्याचे रखडलेले काम तातडीने पूर्ण करा, अन्यथा जनआंदोलन!

युवक काँग्रेसचा आक्रमक पवित्रा ; सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले निवेदन

गडचिरोली : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३५३ वरील शिवनी ते पोटफोडी नदीपर्यंतच्या रस्त्याचे आणि पुलाचे काम मागील एक वर्षापासून रखडलेले आहे. या अर्धवट कामामुळे नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता, दोन महिन्यांच्या आत हे काम पूर्ण न झाल्यास रस्त्यावर उतरून तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेसने दिला आहे. यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांना नुकतेच निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे कि, कंत्राटदाराच्या दिरंगाईमुळे हा मार्ग सध्या मृत्यूचा सापळा बनला आहे. रस्त्यावर पडलेले खड्डे आणि उडणाऱ्या प्रचंड धुळीमुळे वाहनचालक तसेच स्थानिक गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नागरिकांना श्वसनाचे विकार आणि डोळ्यांच्या जळजळीचा त्रास सहन करावा लागत असून, शेतमालाचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. शाळकरी विद्यार्थी, रुग्णवाहिका आणि जड वाहनांची सतत वर्दळ असलेल्या या मार्गावर अपघातांचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. पावसाळ्यात चिखल आणि उन्हाळ्यात धूळ अशा दुष्टचक्रात नागरिक अडकले आहेत.

युवक काँग्रेसने निवेदनातून प्रशासनाला ठणकावून सांगितले आहे की, जनतेच्या आरोग्याशी आणि सुरक्षिततेशी चाललेली ही खेळ थांबवावी. जर पुढील दोन महिन्यांत रस्त्याचे व पुलाचे काम दर्जेदार पद्धतीने पूर्ण झाले नाही, तर जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने ‘चक्का जाम’ व मोठे जनआंदोलन करण्यात येईल.

भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव अ‍ॅड. विश्वजीत मारोतराव कोवासे यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने भेट घेतली. यावेळी नगरसेवक रमेश चौधरी, नगरसेवक नंदू कायरकर, नंदू वाईलकर, अनुसूचित जाती सेलचे जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे, काँग्रेस जिल्हा महासचिव नदीम नाथानी, जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष नितेश राठोड, जितू पाटील मुनघाटे, अभिजीत घाईत, चामोर्शी तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष प्रेमानंद गोंगले आणि अनिकेत राऊत यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button