
चामोर्शीत ‘टाकलेलं पोर’ नाटकाचा प्रयोग
चामोर्शी : येथील जय बजरंग नाट्यकला मंडळ, संताजी नगर आणि चंद्रकमल थिएटर्स (सिंदेवाही/वडसा) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘टाकलेलं पोर’ या सामाजिक आणि लावणीप्रधान नाटकाचा भव्य प्रयोग नुकताच पार पडला. या कार्यक्रमाला अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.
नाट्य प्रयोगाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना राजे अम्ब्रीशराव आत्राम म्हणाले की, “नाटक हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून ते समाजपरिवर्तनाचे एक प्रभावी माध्यम आहे. रंगमंचावरून मांडल्या जाणाऱ्या विषयांच्या माध्यमातून सामाजिक जाणीव जागृत करण्याचे मोठे कार्य घडते.” तसेच, समाजातील विविध क्लिष्ट प्रश्नांवर प्रकाश टाकण्याचे आणि लोकांचे प्रबोधन करण्याचे सामर्थ्य नाटकात असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
यावेळी माजी खासदार अशोक नेते, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, युवा नेते कुमार अवधेशरावबाबा आत्राम, जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष बाबुराव कोहळे, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणय खुणे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नेटके आयोजन नगरसेवक आशिष पिपरे आणि नगर पंचायत सभापती सोनाली पिपरे यांनी केले.
सामाजिक विषयावर आधारित आणि लावणीची जोड असलेल्या या नाटकाला चामोर्शीतील रसिक प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती. स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि समाजप्रबोधन करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या प्रयोगाचे परिसरात कौतुक होत आहे.



