निवडणुकीत सत्ता येण्यासाठी योजनांचा पाऊस ; सत्तेत येताच अनेक योजना बंद – विजय वडेट्टीवारांचा आरोप

निवडणुकीत सत्ता येण्यासाठी तिजोरी कडे न बघता योजनांच्या घोषणा केल्या आता खुर्चीदर्शन झाल्याने तीर्थदर्शन सारख्या योजना बंद करत आहे – वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर साधला निशाणा
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकी आधी महायुती सरकारने मतांसाठी विविध योजनांची घोषणा केली, तेव्हा तिजोरीकडे बघितले नाही, आता मात्र एका मागून एक योजना बंद करण्याची तयारी आहे. आता खुर्चीदर्शन झाल्याने मुख्यमंत्री तीर्थदर्शन, आनंदाचा शिधा, शिवभोजन थाळी या योजना बंद करण्याची तयारी सुरू असल्याची टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.
मुंबईत पत्रकारांशी बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले मतांसाठी योजनांचा गाजावाजा करत घोषणा केली, तेव्हा तिजोरीकडे बघितल नाही. आता सत्ता आल्यावर या योजना बंद करत आहे. पैसे नसल्याने लाडकी बहिण योजनेतही अटी शर्ती लागू करून लाभार्थी महिला काही लाखात आणण्याचा सरकारचा घाट आहे अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.
भाजप आमदार सुरेश धस यांनी नुकताच परभणी प्रकरणी पोलिसांना माफ करावे, गुन्हे दाखल करू नये ही भूमिका घेतली यावर सुरेश धस यांचा हा दुटप्पीपणा आहे. एका दलित व्यक्तीचा खून होतो, तेव्हा पोलिसांना संरक्षण देण्याची भाजप आमदाराची भाषा ही जातीय द्वेष निर्माण करणारी आहे. कोणीही दोषी असेल तर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे असे वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी केले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले , त्यांच्या विरोधात सरकार कारवाई का करत नाही असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. निवडणुकीत छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. आंबेडकर यांची नावं घ्यायची मत मिळवायची, सत्ता आल्यावर आपल्या दैवतांचा अपमान करण्या विरोधात सरकार कारवाई करत नाही. इतिहासकार नसताना कोणाच्या इशाऱ्यावर सोलापूरकर अशी वक्तव्य करत आहेत अशी टीका काँग्रेस नेते वडेट्टीवार यांनी केली.



