
अतिदुर्गम भागात ‘राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण‘ मोहिमेचा धडाका; ७०% तरुणांना फिजिओथेरपीची गरज!
गोंदिया : आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत आणि तासनतास संगणकासमोर बसून काम करण्याच्या पद्धतीमुळे पूर्वी चाळिशी-पन्नाशीत दिसणारे सांधेदुखीचे विकार आता विशी-तिशीतच तरुणांना जडू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर, देवरी तालुक्यातील अतिदुर्गम ग्रामीण रुग्णालय, चिचगड येथे मोफत फिजिओथेरपी व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरुषोत्तम पटले आणि अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तृप्ती कटरे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आलेल्या या उपक्रमाला स्थानिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. आजकालच्या २५ ते ३५ वयोगटातील सुमारे ७० टक्के तरुणांना फिजिओथेरपी उपचारांची गरज भासत असल्याचे धक्कादायक वास्तव वैद्यकीय अधिक्षक डॉ. राऊत यांनी मांडले. सलग काही तास संगणकासमोर काम करताना खुर्चीवर चुकीच्या पद्धतीने बसले जाते. त्याचा मान आणि पाठीवर ताण येते. त्याचप्रमाणे वाहनांचा वापर वाढला असून दररोज कामासाठी लांबवर करावा लागणारा प्रवास, वाहतूक कोंडीमुळे प्रवासाला लागणारा अधिक वेळ आणि रस्त्यांच्या दुर्दशेमुळे वाहने चालविताना पाठ, मानेवर येणारा ताण यांमुळे मानेचे आणि खांद्याचे स्नायू दुखायला लागतात. बदलत्या जीवनशैलीमुळे सध्या तरुणांच्या आहारातही बदल झाला आहे. त्यामुळे हाडे, स्नायू कमकुवत होत आहेत. त्यामुळे नोकरदार तरुण वर्गाला फिजिओथेरपीची गरज भासत आहे. डोकेदुखी, रक्तदाब, अॅसिडिटी, मधुमेह, स्थूलता, हृदयरोग आणि ऑस्टिओआर्थरायटिस आजार झपाट्याने वाढत आहेत तसेच तोल जाणे यासारखे त्रास सुरू होतात. संबंधित त्रास असणाऱ्या रुग्णांना फिजिओथेरपीच्या मदतीने जीवनमान सुधारण्यास मदत होते. हृदयविकार आणि स्ट्रोकनंतर पुनर्वसन: कार्डिअॅक रिहॅबिलिटेशनसाठी खास व्यायाम पद्धतींचा उपयोग केला जातो, ज्यामुळे रुग्णाचे हृदय आरोग्य सुधारते. मधुमेह आणि लठ्ठपणा: वजन नियंत्रणासाठी फिजिओथेरपी व्यायाम उपयोगी पडतो.
भौतिक उपचार तज्ञ डॉ. कांचन भोयर यांनी उपस्थितांना व्यायामाचे प्रात्यक्षिक दाखवत त्याचे महत्त्व पटवून दिले. “फिजिओथेरपीमुळे केवळ स्नायूंची ताकद वाढत नाही, तर हृदयविकार, स्ट्रोक (पक्षाघात) आणि लठ्ठपणा यांसारख्या समस्यांवरही नियंत्रण मिळवता येते,” असे त्यांनी नमूद केले. शिबिरादरम्यान केवळ फिजिओथेरपीच नव्हे, तर रक्तदाब (BP) आणि रक्तातील साखरेची (Diabetes) तपासणीही करण्यात आली. डॉ. राऊत, डॉ. जार्वे, स्टाफ नर्स निशा आचले, पुनम कुंभरे, चेतना वाघमारे, राजू चचाणे, पुरुषोत्तम मेंढे, विद्या काळे, पतीराम भोयर, लीना कहाने आणि सचिन सैय्यद यांनी आरोग्य सेवा दिली.
“नुसते आजार झाल्यावर औषधे घेण्यापेक्षा, ते होऊच नयेत म्हणून सक्रिय राहणे गरजेचे आहे. शाळांपासूनच व्यायामाचे महत्त्व रुजवले पाहिजे. चांगले आरोग्य हीच आपली खरी संपत्ती आहे, त्यासाठी दररोज थोडा वेळ शरीराला द्या,” असे आवाहन डॉ. पुरुषोत्तम पटले यांनी केले आहे.



