महाराष्ट्रमुंबई

संत शिरोमणी रविदास महाराज जयंती उत्साहात साजरी ; मौलाना आझाद युवा मंचकडून अभिवादन

माजलगाव : येथील राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने संत शिरोमणी रविदास महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने आयोजित विशेष कार्यक्रमात विविध सामाजिक संघटनांच्या वतीने महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मौलाना आझाद युवा मंचने उपस्थित राहून संत रविदास महाराजांच्या मानवतावादी विचारांना उजाळा दिला.

कार्यक्रमात बोलताना मान्यवरांनी सांगितले की, संत रविदास महाराजांचे विचार आजही समाजासाठी दिशादर्शक आहेत. त्यांनी दिलेला समता, बंधुता, मानवता आणि सामाजिक न्यायाचा संदेश हा केवळ एका समाजापुरता मर्यादित नसून तो संपूर्ण मानवजातीसाठी आहे. हिंदू-मुस्लिम ऐक्य आणि सर्वधर्मीय सलोखा हीच आजच्या काळाची गरज असून महाराजांच्या शिकवणीतून ‘धर्म वेगळे असले तरी माणुसकी एकच आहे’ हा विचार प्रकर्षाने समोर येतो.

मौलाना आझाद युवा मंचच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “अन्याय, भेदभाव आणि विषमता दूर करून सर्व समाज घटकांना एकत्र आणण्याचे महाराजांचे कार्य प्रेरणादायी आहे. हिंदू-मुस्लिम एकतेच्या माध्यमातून त्यांचे विचार समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.”

या कार्यक्रमाप्रसंगी नाना नाटकर, प्रा. बाळासाहेब येवले, एस. नारायण, सचिन कांबळे, राजेश जाधव, अशोक वाडेकर, सुभाष कांबळे यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button