
३०० तरुणांचा सहभाग; ‘उजव्या बाजूने चाला’ म्हणत आरटीओने दिले भावनिक आवाहन
भंडारा : वाढत्या अपघातांना लगाम घालण्यासाठी आणि वाहतूक नियमांची जनजागृती करण्यासाठी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO), भंडारा यांच्या वतीने शहरात भव्य ‘वॉकेथॉन’ (Walkathon) आयोजित करण्यात आली होती. सुमारे ३०० तरुण-तरुणींच्या उत्स्फूर्त सहभागाने निघालेल्या या रॅलीने भंडारावासीयांचे लक्ष वेधून घेत रस्ता सुरक्षेचे महत्त्व पटवून दिले.
हा उपक्रम उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. सतीश जाधव यांच्या नेतृत्वाखाली पार पडला. रॅलीमध्ये मोटार वाहन निरीक्षक वैभव गुल्हाणे, निलेश दहेकर, बालाजी वर्धन, शेखर आचार्य, सुहास ठोंबरे, प्रशांत पाटील यांच्यासह सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक सागर सराफ, गुलशन कुमार चावरे, अनिल ढोले, श्रीमती मेघाराणी काशिद आणि आरटीओ कार्यालयातील सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
विशेष म्हणजे, अनाथपिंडक ॲथलेटिक्स क्लबचे संचालक जयंत तांडेकर व त्यांचे विद्यार्थी, तसेच जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक जितेंद्र बोरकर यांनीही या मोहिमेत खांद्याला खांदा लावून सहभाग नोंदवला. या वॉकेथॉनचे खास वैशिष्ट्य म्हणजे आरटीओ आणि वाहतूक विभागाच्या वाहनांवरील ध्वनिक्षेपकाद्वारे (Loudspeaker) नागरिकांना करण्यात आलेले भावनिक आवाहन. “रस्त्यावरील शिस्त ही केवळ दंड टाळण्यासाठी नसून तुमचे प्राण वाचवण्यासाठी आहे,” हा काळजाला भिडणारा संदेश शहरातील मुख्य चौकांमध्ये घुमत होता.
उप प्रादेशिक परिवहन कार्यालयापासून सुरू झालेली ही रॅली शहरातील प्रमुख गजबजलेल्या ठिकाणांहून मार्गस्थ झाली. जिल्हा परिषद चौक व राजीव गांधी चौक, मुस्लिम लायब्ररी व गांधी चौक, पोस्ट ऑफिस चौक व बस स्टँड परिसर, त्रिमूर्ती चौक अशा विविध मार्गांवरून जनजागृती करत ही रॅली पुन्हा आरटीओ कार्यालयात विसर्जित झाली.
अपघात टाळण्यासाठी पादचाऱ्यांनी नेहमी रस्त्याच्या उजव्या बाजूने (वाहतुकीच्या समोरासमोर) चालावे, जेणेकरून समोरून येणारी वाहने स्पष्ट दिसतील आणि सुरक्षित अंतर राखता येईल, या तांत्रिक नियमाचा विशेष प्रचार या रॅलीतून करण्यात आला.
आरटीओ, पोलीस विभाग, ॲथलेटिक्स क्लब आणि तरुणाईच्या या संयुक्त प्रयत्नामुळे भंडारा शहरात रस्ता सुरक्षेचा संदेश घराघरात पोहोचला आहे. नागरिकांनी या नियमांचे पालन करावे, असे आवाहन आरटीओ प्रशासनाकडून करण्यात आले आहे.



