गडचिरोलीविदर्भ

कुणबी समाजाच्या वतीने भव्य संत तुकाराम महाराज जयंती उत्सव ; आरोग्य शिबिर आणि शोभायात्रा

नगराध्यक्ष प्रणोती निंबोरकर यांची प्रमुख उपस्थिती ; गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव आणि मंदिर भूमिपूजन

गडचिरोली : जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून गडचिरोली येथे कुणबी समाजाच्या वतीने भव्य जयंती उत्सव आणि स्नेह मिलन सोहळ्याचे उत्साहात आयोजन करण्यात आले. या सोहळ्यात भक्तिभावाचा आणि सामाजिक बांधिलकीचा अनोखा संगम पाहायला मिळाला. नगराध्यक्ष प्रणोती सागर निंबोरकर यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती लाभली.

उत्सवाचे मुख्य आकर्षण ठरली ती शहरातून काढण्यात आलेली भव्य रॅली आणि शोभायात्रा. पारंपरिक वेशभूषा केलेल्या महिला-पुरुष, ढोल-ताशांचा गजर आणि पारंपरिक नृत्यांच्या सादरीकरणाने गडचिरोलीकरांचे लक्ष वेधून घेतले. “तुकाराम-तुकाराम” च्या नामघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. या शोभायात्रेमुळे शहरात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते.

केवळ धार्मिक उत्सव न ठेवता समाजात विधायक संदेश जावा, यासाठी याप्रसंगी विविध आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये रक्तदान शिबिर व रक्तगट तपासणी,  रक्तदाब व मधुमेह (Sugar) तपासणी,  दंतचिकित्सा व नेत्र तपासणी शिबिर या शिबिरांचा लाभ समाजबांधवांसह, माता-भगिनी आणि मोठ्या संख्येने नागरिकांनी घेतला.

स्नेह मिलन सोहळ्यादरम्यान सन २०२५ मध्ये दहावी व बारावीच्या परीक्षेत देदीप्यमान यश मिळवणारे विद्यार्थी आणि शासकीय सेवेत नवनियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. याच सोहळ्याचे विशेष महत्त्व म्हणजे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या प्रतिष्ठापनेसाठी भूमिपूजनाचा कार्यक्रम मोठ्या थाटात पार पडला.

कार्यक्रमाला संबोधित करताना नगराध्यक्ष प्रणोती निंबोरकर म्हणाल्या की, “संत तुकाराम महाराजांचे विचार आजच्या युवा पिढीसाठी दिशादर्शक आहेत. सामाजिक एकोपा आणि मानवतेचा संदेश देणाऱ्या अशा उपक्रमांना नगरपालिकेचे नेहमीच सहकार्य राहील.” कुणबी समाजाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या शिस्तबद्ध नियोजनाचेही त्यांनी कौतुक केले.

यावेळी नगरपालिकेचे उपाध्यक्ष, सभापती, नगरसेवक, विविध पक्षांचे नेते आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची सांगता सामुदायिक स्नेहभोजनाने झाली. या सोहळ्याला गडचिरोली जिल्ह्यातील कुणबी समाजबांधव आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button