स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतर मंगेवाड्यात पहिल्यांदाच पोहोचले लोकप्रतिनिधी

आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी जि.प. शाळेला भेट देऊन केली पाहणी, विद्यार्थ्यांशी साधला संवाद
धानोरा : छत्तीसगड राज्याच्या सीमेवर वसलेले, घनदाट जंगलांनी वेढलेले आणि भौगोलिकदृष्ट्या अत्यंत दुर्गम असलेले मंगेवाडा गाव एका ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार ठरले. स्वातंत्र्यानंतर तब्बल ७५ वर्षे उलटूनही ज्या गावाच्या वेशीवर आजवर एकाही लोकप्रतिनिधीचे पाऊल पडले नव्हते, तिथे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी प्रत्यक्ष पोहोचून इतिहास घडवला. लोकप्रतिनिधींच्या या पहिल्याच भेटीने ग्रामस्थांच्या डोळ्यांत नवी उमेद जागवली आहे.
मंगेवाडा गाव म्हणजे प्रतिकूल परिस्थितीचा डोंगर. मात्र, रस्ते नसतानाही डोंगर-दऱ्या आणि कच्चे रस्ते तुडवत डॉ. नरोटे मंगेवाडा जिल्हा परिषद शाळेत दाखल झाले. यावेळी आपल्या गावात प्रथमच कुणी आमदार आला आहे, हे पाहून ग्रामस्थ, शिक्षक आणि चिमुकले विद्यार्थी भावूक झाले होते. केवळ निवडणुकांच्या काळात नावे ऐकणाऱ्या गावकऱ्यांसाठी ही भेट आश्वासक ठरली.
डॉ. नरोटे यांनी केवळ औपचारिक भेट न देता थेट वर्गात जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शैक्षणिक समस्या: सीमावर्ती भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील अडथळे. पायाभूत सुविधा: शाळेची पडकी इमारत आणि शैक्षणिक साहित्याचा अभाव. मूलभूत गरजा: पिण्याच्या पाण्याची टंचाई आणि दळणवळणाची साधने. या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केली. भौगोलिक अंतर कितीही असले, तरी आता विकासाचे अंतर उरणार नाही. मंगेवाड्याचा कायापालट करणे हाच माझा ठाम निर्धार आहे. असे आमदार नरोटे म्हणाले.
या ऐतिहासिक भेटीदरम्यान आमदारांनी शाळेच्या पायाभूत सुविधा मजबूत करणे, विद्यार्थ्यांना आधुनिक शैक्षणिक साधने उपलब्ध करून देणे आणि पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करण्यासाठी शासनस्तरावर विशेष पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. वर्षानुवर्षे विकासापासून वंचित राहिलेल्या या भागासाठी ही एक नवी पहाट मानली जात आहे.
यावेळी भाजप तालुकाध्यक्ष साजन गुंडावार, जिल्हा उपाध्यक्ष अनिल पोहनकर, तालुका महामंत्री शुभाष घाईत, कोषाध्यक्ष शुभाष खोबरे, युवा नेते श्रीनिवास दुलमवार, पवन येरमे, अविनाश पोरेटी आदी पदाधिकारी उपस्थित होते. सर्वांनी मिळून या अतिदुर्गम भागातील दीर्घकाळ प्रलंबित समस्या सोडवण्याचा संकल्प केला.
स्वातंत्र्यानंतर प्रथमच लोकप्रतिनिधींच्या पावलांनी मंगेवाडात विकासाची नांदी झाली असून, सीमावर्ती भागातील विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत आता उज्ज्वल भविष्याची स्वप्ने फुलू लागली आहेत.



