गडचिरोलीविदर्भ

तुमडी येथील दारूविक्रेत्यावर गुन्हा दाखल

दारूविक्री बंद करण्याची महिलांची मागणी

गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील तुमडी येथील विक्रेत्यांविरोधात आष्टी पोलिस व मुक्तीपथ टीमने संयुक्त मोहीम राबवित 6 विक्रेत्यांच्या घरी तपासणी केली असता एका विक्रेत्याकडे हातभट्टी मोहफुलाची दारू आढळून आली. पोलिसांनी मुद्देमाल जप्त करीत विक्रेत्यावर गुन्हा दाखल केला असून इतर विक्रेत्यांनी तत्काळ अवैध व्यवसाय बंद करण्याचे आवाहन करण्यात आले.

मुक्तीपथ अभियानांतर्गत सघन भेट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमादरम्यान गावातील महिलांची विशेष बैठक पार पडली. या बैठकीला एकूण ४५ महिलांनी सहभाग नोंदवला. बैठकीत महिलांनी आपली व्यथा मांडताना सांगितले की, मागील काही महिन्यांपासून गावात अवैध दारूविक्री सुरू आहे. त्यामुळे दारूविक्री बंद असलेल्या नरेंद्रपूर, ठाकूरनगर, गुंडापल्ली या परिसरातील मद्यपी तुमडी गावात दारू पिण्यासाठी येत आहेत. याचा थेट परिणाम गावातील महिलांवर व नागरिकांवर होत असून त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. गावात सहा दारू विक्रेते सक्रिय झाले असल्याचे सांगितले.

दरम्यान, अवैध दारूविक्रीची समस्या लक्षात घेता, आष्टी पोलिस स्टेशन व मुक्तीपथच्या संयुक्त कारवाईत एका दारू विक्रेत्याच्या घरी तपासणी करण्यात आली असता पाच लिटर दारू जप्त करण्यात आली. संबंधित विक्रेत्याविरुद्ध आष्टी पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच इतरही विक्रेत्यांच्या घरी तपासणी करीत पुन्हा अवैध दारूविक्री करताना आढळून आल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला. या कारवाई दरम्यान आष्टी पोलिस स्टेशनचे पीएसआय पवार, इतर पोलिस कर्मचारी तसेच मुक्तीपथचे संघटक आनंद इंगळे उपस्थित होते. यावेळी महिलांनी गावातील सर्व दारू विक्रेत्यांवर कठोर कारवाई करून तुमडी गाव दारूविक्रीमुक्त करण्याची मागणी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button