गोंदियाविदर्भ

सामाजिक न्याय विभागाच्या छायाचित्र प्रदर्शनीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

अंगणवाडी सेविकांची मोठी उपस्थिती

गोंदिया : अनुसूचित जातीतील घटकांसाठी शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालय आणि सामाजिक न्याय विभाग यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या त्रैदिवसीय छायाचित्र प्रदर्शनीला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. गोंदिया येथील नवीन प्रशासकीय इमारतीच्या तळमजल्यावर सुरू असलेल्या या प्रदर्शनीचा गुरुवारी दुसरा दिवस होता.

शासकीय कामासाठी प्रशासकीय इमारतीत येणाऱ्या नागरिकांनी या प्रदर्शनीला भेट देऊन आपल्यासाठी उपयुक्त असणाऱ्या योजनांची सविस्तर माहिती जाणून घेतली. विशेषतः अनुसूचित जातीतील घटकांसाठी राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांची छायाचित्रे आणि माहिती फलक येथे लावण्यात आले आहेत.

प्रदर्शनीच्या दुसऱ्या दिवशी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून योजनांची माहिती घेतली. यासोबतच प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही या उपक्रमाचे कौतुक केले. यामध्ये ज्योती कांबळे (उपविभागीय अधिकारी, अर्जुनी मोरगाव), अर्चना माळवे (जिल्हा उपनिबंधक व जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी), मीनाक्षी कांबळे (जिल्हा ग्रंथालय अधिकारी), संजय जोशी (सदस्य, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग) यांनी प्रदर्शनीला भेट देऊन पाहणी केली.

हे प्रदर्शन तीन दिवसांचे असून, जास्तीत जास्त नागरिकांनी आणि गरजू लाभार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button