इन्स्टाग्रामवरील प्रेम ठरले जीवघेणे! ; गोंदियाच्या तरुणीची भोपाळमध्ये हत्या, मृतदेह पेटीत कोंबून टाकीत फेकला

‘व्हॅलेंटाईन वीक’मध्ये धक्कादायक घटना
गोंदिया : व्हॅलेंटाईन वीकच्या काळात प्रेमाच्या आणाभाका घेतल्या जात असतानाच, गोंदियातील एका तरुणीच्या आयुष्याचा करुण अंत झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इन्स्टाग्रामवर झालेल्या ओळखीचे रूपांतर विवाहात झाले, मात्र अवघ्या काही दिवसांतच पतीने पत्नीचा गळा दाबून खून केला आणि तिचा मृतदेह एका पत्र्याच्या पेटीत भरून पाण्याच्या टाकीत फेकून दिला. अशरफी ऊर्फ सिया (३३, रा. गोंदिया) असे मृत तरुणीचे नाव असून, ही घटना १२ फेब्रुवारी रोजी भोपाळ येथे उघडकीस आली.
सोशल मीडियावरील मैत्री आणि तिसरे लग्न मिळालेल्या माहितीनुसार, सिया सोशल मीडियावर अत्यंत सक्रिय होती आणि तिचे हजारो फॉलोअर्स होते. याच व्यासपीठावर तिची ओळख भोपाळमधील समीर नावाच्या रिक्षाचालकाशी झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाल्यानंतर सियाने घर सोडून समीरसोबत संसार थाटण्याचा निर्णय घेतला. मात्र, समीरचे हे तिसरे लग्न होते. त्याची पहिली पत्नी त्याला सोडून गेली होती, तर दुसरी पत्नी त्याच्यासोबतच राहत होती.
घरातील कलह ठरला कारणीभूत समीरने सियाला घरी आणल्यावर सुरुवातीला ती आपली ‘मेहुणी’ असल्याचे शेजाऱ्यांना सांगितले होते. मात्र, कालांतराने त्यांच्या लग्नाचे सत्य समोर आले. एकाच घरात दोन पत्नींना ठेवण्यावरून समीरच्या घरात सतत वादाचे ठिणगी पडत होती. याच वादातून त्याची दुसरी पत्नी काही दिवसांपूर्वीच माहेरी निघून गेली होती.
हत्येचा थरार: हुंड्याच्या पेटीत मृतदेहाची विल्हेवाट
तीन दिवसांपूर्वी समीर आणि सिया यांच्यात जोरदार भांडण झाले. रागाच्या भरात समीरने सियाचा गळा दाबून तिची हत्या केली. पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने आपल्या दुसऱ्या लग्नात हुंड्यात मिळालेली पत्र्याची पेटी वापरली. सियाचा मृतदेह त्या पेटीत कोंबून त्याने घराशेजारील पाण्याच्या टाकीत फेकून दिला. धक्कादायक बाब म्हणजे, पत्नीची हत्या केल्यानंतर समीर निर्धास्तपणे आपल्या दुसऱ्या पत्नीला आणण्यासाठी जबलपूरला निघून गेला होता.
‘टॅटू’मुळे पटली ओळख
१२ फेब्रुवारी रोजी परिसरातील एका पाण्याच्या टाकीत संशयास्पद पेटी तरंगताना आढळली. पोलिसांनी पेटी उघडली असता त्यात कुजलेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह सापडला. मृतदेहाच्या हातावर ‘दीप’ नावाचा टॅटू आणि जन्म तारीख कोरलेली होती, ज्यावरून मृताची ओळख सिया म्हणून पटली.
तपास आणि कारवाई मृतदेह तीन ते चार दिवस जुना असल्याने तो कुजण्यास सुरुवात झाली होती. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून संशयाची सुई पती समीरकडे वळल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. सध्या त्याची कसून चौकशी केली जात असून या घटनेने गोंदिया आणि भोपाळ परिसरात खळबळ उडाली आहे.



