गडचिरोलीविदर्भ

दारू व तंबाखू नियंत्रणाकरिता निरंतर कृती करा – तहसीलदार अजय सकूनदरवार यांचे निर्देश

सिरोंचात तालुकास्तरीय आढावा सभा ; शाळा-कार्यालयांच्या १०० यार्ड परिसरात तंबाखू विक्रीवर बंदीचे आदेश

सिरोंचा : ‘दारू व तंबाखूमुक्त गडचिरोली जिल्हा विकास कार्यक्रम’ अंतर्गत सिरोंचा येथे तालुकास्तरीय समितीची महत्त्वपूर्ण आढावा सभा पार पडली. “तालुक्यातील अवैध दारू आणि तंबाखू विक्रीचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी केवळ कागदी घोडे न नाचवता, सर्व संबंधित विभागांनी निरंतर आणि ठोस कृती करावी,” असे निर्देश तहसीलदार अजय सकूनदरवार यांनी यावेळी दिले.

तहसीलदार कार्यालयात आयोजित या बैठकीत तालुक्यातील व्यसनमुक्तीच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला आणि भविष्यातील कृती आराखडा निश्चित करण्यात आला. नगरपंचायत क्षेत्रातील सुगंधी तंबाखू विक्रीच्या ठिकाणांवर तातडीने छापे टाकून कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सर्व शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये आणि आरोग्य संस्थांच्या १०० यार्ड परिसरात तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली असून, उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. किरणा दुकानांमधून होणारी तंबाखूजन्य पदार्थांची बेकायदेशीर विक्री तातडीने बंद करण्याबाबत कडक सूचना देण्यात आल्या आहेत. गरोदर व स्तनदा मातांच्या बैठका घेऊन त्यांना तंबाखूजन्य पदार्थांच्या घातक परिणामांची माहिती द्यावी आणि त्यांना या व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत. गावपातळीवर दारूचे प्रमाण कमी करण्यासाठी स्थानिक महिला संघटनांना बळकट करण्यात येईल. गावातील दारूविक्री बंद करण्याबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी विशेष ग्रामसभांचे आयोजन करण्यावर भर दिला जाणार आहे. ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागांत दारूचे प्रमाण कमी करण्यासाठी ‘मुक्तीपथ’ संघटना आणि पोलीस विभागाने परस्पर समन्वयाने नियोजन करून संयुक्त मोहिमा राबवाव्यात, अशा सूचना देण्यात आल्या.

या बैठकीला तहसीलदार अजय सकुदरवार यांच्यासह तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोहर कन्नाके, उमेद समन्वयक महेश नीलम, नायब तहसीलदार नरेन्द्र हलामी, महेश चोल्ले, मारोती लोकडे, वनपाल सुरेखा नीलम, सुरपाम, विस्तार अधिकारी बनसोड, मुक्तीपथ तालुका संघटक सुनीता भगत, शंकर गागुरी, सोनी कोंड्रा, मादेशी यांसह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button