गडचिरोलीविदर्भ

आदिवासी संस्कृतीची मूल्यव्यवस्था खऱ्या अर्थाने जीवन समृद्ध करणारी – डॉ. नरेश मडावी

वनश्री महाविद्यालयात ‘आदिवासी वारसा आणि जननायकांचा इतिहास’ या विषयावर चर्चासत्र

गडचिरोली : “आदिवासी संस्कृतीचा इतिहास हजारो वर्षांचा वैभवशाली असून तो समृद्ध जीवनाची साक्ष देणारा आहे. गोंडवाना साम्राज्याचा इतिहास राजकीय, सांस्कृतिक आणि आर्थिकदृष्ट्या प्रगत होता. आजच्या तरुण पिढीने आपल्या या गौरवशाली इतिहासातून प्रेरणा घेऊन स्वतःचे जीवन समृद्ध करावे,” असे प्रतिपादन डॉ. नरेश मडावी यांनी केले.

शहीद बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंती वर्षाचे औचित्य साधून गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीद्वारे ‘जनजातीय गौरव वर्ष’ साजरे केले जात आहे. याच उपक्रमांतर्गत विद्यापीठाचे आदिवासी अध्यासन केंद्र आणि वनश्री कला व विज्ञान महाविद्यालय, कोरची यांच्या संयुक्त विद्यमाने “आदिवासी वारसा आणि जननायकांचा इतिहास” या विषयावर एकदिवसीय चर्चासत्राचे आयोजन १४ फेब्रुवारी रोजी करण्यात आले होते.

मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलताना डॉ. मडावी पुढे म्हणाले की, “गोंडी भाषा ही द्राविडी भाषाकुलातील अनेक भाषांची जननी आहे. मात्र, स्वातंत्र्यप्राप्तीनंतर झालेल्या भाषावार प्रांतरचनेमुळे गोंडी भाषिक समाज विविध राज्यांमध्ये विखुरला गेला, परिणामी या मातृभाषेचे अस्तित्व आज धोक्यात आले आहे. आदिवासींकडे ‘मागास’ म्हणून पाहणाऱ्या प्रगत समाजाने आधी स्वतःचे निकष तपासून पाहण्याची गरज आहे.”

चर्चासत्राचे उद्घाटक प्राचार्य उमाकांत ढोक यांनी आदिवासींच्या ‘गोटूल’ शिक्षण पद्धतीवर प्रकाश टाकला. “गोटूल ही वास्तविक जीवनाचे शिक्षण देणारी संस्था होती. आजची पिढी आधुनिकीकरणाच्या नावाखाली आपल्या मौलिक तत्त्वांपासून दुरावत चालली आहे,” अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

अध्यक्षीय भाषणात कार्यकारी प्राचार्य डॉ. व्ही. टी. चहारे यांनी सांगितले की, आदिवासी समाज व्यवस्था ही समूहाचा विचार करणारी आणि माणूसपण जोपासणारी आहे. संयुक्त कुटुंबपद्धती आणि मर्यादित साधनांत समाधान मानणारी ही संस्कृती प्रगत समजल्या जाणाऱ्या समाजासाठी मार्गदर्शक आहे.

कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला. प्रा. आर. एस. रोटके यांनी चर्चासत्राची भूमिका मांडली. संचालन व आभार: प्रा. प्रदीप चापले यांनी संचालन केले, तर प्रा. जे. के. विनायक यांनी आभार मानले. यशस्वीतेसाठी आदिवासी अध्यासन केंद्राचे समन्वयक डॉ. वैभव मसराम, समन्वयक प्रा. समीर मिसार, प्रा. समृद्धी कावळे, अरुण उईके, प्रकाश मेश्राम यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि शासकीय आश्रमशाळा कोरची येथील शिक्षक व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button