
अशोकनगर-फुलमोगरा गावातील घटना
भंडारा : प्रसिद्ध बॅटरी कंपनीची डीलरशिप देण्याचे आमिष दाखवून एका तरुणाची ३.५० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार जिल्ह्यात उघडकीस आला आहे. याप्रकरणी भंडारा सायबर पोलिसांनी अज्ञात मोबाइल वापरकर्त्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास वेगाने सुरू केला आहे.
अशोकनगर-फुलमोगरा येथील रहिवासी आणि वजनकाटा संचालक नितेश रामटेके (३८) यांना १ ऑक्टोबर २०२५ रोजी एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला. फोन करणाऱ्याने स्वतःची ओळख बंगळुरू येथील एका नामवंत बॅटरी उत्पादक कंपनीचा व्यवस्थापकीय संचालक ‘मोहितकुमार त्यागी’ अशी करून दिली.
आरोपीने नितेश यांना दुचाकी, चारचाकी, सौर बॅटरी आणि इलेक्ट्रॉनिक वजनकाट्यांची अधिकृत डीलरशिप देण्याची ऑफर दिली. नितेश यांचा विश्वास संपादन करण्यासाठी आरोपीने कंपनीचे बनावट कागदपत्रे आणि ई-मेल पाठवले. डीलरशिपच्या प्रक्रियेसाठी साडेतीन लाख रुपयांची मागणी करण्यात आली. नितेश यांनी आरोपीने दिलेल्या बँक खात्यावर २८ डिसेंबर २०२५ पर्यंत टप्प्याटप्प्याने एकूण ३ लाख ५० हजार रुपये जमा केले. रक्कम मिळाल्यानंतर साधारण महिनाभर आरोपीने नितेश यांना प्रतिसाद दिला, मात्र त्यानंतर त्याने आपला फोन बंद केला आणि तो संपर्काबाहेर गेला.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच नितेश रामटेके यांनी भंडारा पोलीस ठाण्यात धाव घेऊन लेखी तक्रार नोंदवली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी शुक्रवारी (१३ फेब्रुवारी) आरोपीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपीचे बँक खाते तात्काळ गोठवले (Freeze) आहे. ज्या मोबाइल नंबरवरून फोन आला होता, त्याचे कॉल डिटेल्स (CDR) प्राप्त करण्यात आले असून आरोपीचे लोकेशन शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सध्या पोलीस निरीक्षक कृष्णा तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
कोणत्याही अनोळखी व्यक्तीने फोनवरून व्यवसायाची किंवा डीलरशिपची ऑफर दिल्यास, अधिकृत वेबसाइटवर जाऊन खात्री केल्याशिवाय पैसे भरू नका. फसवणूक झाल्यास तात्काळ १९३० या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.



