क्राईमगडचिरोलीविदर्भ

पावीमुरांड्यात राज्य उत्पादन शुल्कचा छापा; १ लाखाची दारू जप्त

अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई ; घरातून विदेशी दारू व बिअरचा साठा जप्त

गडचिरोली : होळीच्या सणादरम्यान जिल्ह्यात अवैध दारूचा पूर वाहू नये, यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने ‘ॲक्शन मोड’ सुरू केला आहे. या मोहिमेअंतर्गत पावीमुरांडा येथील एका घरात छापा टाकून सुमारे १ लाख ५ हजार ३६० रुपयांचा देशी-विदेशी दारूचा साठा जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे अवैध दारू विक्रेत्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाला गोपनीय माहिती मिळाली होती की, पावी मुरांडा येथील श्रीकृष्ण पत्रू चापडे याने आपल्या राहत्या घरी मोठ्या प्रमाणात दारूचा साठा लपवून ठेवला आहे. या माहितीच्या आधारे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने पंचांसह अचानक छापा टाकला. झडती घेतली असता, घराच्या कोपऱ्यात लपवलेले दारूचे अनेक बॉक्स आढळून आले.

पथकाने घटनास्थळावरून 4 खाकी खरड्याच्या खोक्यात रॅायल स्टॅग डिलक्स व्हिस्कीच्या 180 मिली मापाच्या 192 सिलबंद बाटल्या, 3 खाकी खरड्याच्या खोक्यात हॅावर्ड स्ट्र्राँग बिअरच्या 72 टिन कॅन, 12 खाकी खरड्याच्या खोक्यात रॅाकेट देशी दारूच्या 1200 सिलबंद बाटल्या असा एकूण 1 लाख 5360 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

याप्रकरणी आरोपी श्रीकृष्ण चापडे याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे प्रभारी निरीक्षक शु. ले. चौधरी, दुय्यम निरीक्षक चं. वि. भगत, वि. पु. शेंदरे आणि श्री. रा. सुरजुसे यांच्या पथकाने पार पाडली. प्रकरणाचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक चं. वि. भगत करीत आहेत.

होळी आणि धुलीवंदनाच्या काळात जिल्ह्यात शांतता राहावी आणि अवैध दारूची तस्करी रोखली जावी, यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने ठिकठिकाणी भरारी पथके तैनात केली आहेत. “अवैध दारू विक्री किंवा वाहतूक करणाऱ्यांची गय केली जाणार नाही,” असा इशारा अधीक्षक नितीन धार्मिक यांनी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button