
सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजन; विष्णूजी देशमुख आणि पं. विनोदजी बिहारी गोस्वामी महाराजांचे मार्गदर्शन
कुरखेडा : शहरातील श्रीरामनगर येथील श्रीराम मंदिर आणि सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित ‘विराट हिंदू संमेलन’ अत्यंत उत्साहात आणि भव्य प्रतिसादात संपन्न झाले. सनातन संस्कृतीचे जतन, धर्माचे रक्षण आणि सामाजिक एकतेचा संदेश देणाऱ्या या संमेलनाने कुरखेडा शहरात एक नवी चेतना आणि ऊर्जा निर्माण केली आहे.
रविवार, १ मार्च रोजी दुपारी १ वाजता शहरातील हनुमान मंदिरापासून भव्य शोभायात्रेला सुरुवात झाली. ढोल-ताशांच्या गजरात आणि प्रभू श्रीरामाच्या जयघोषात निघालेली ही यात्रा शहरातील प्रमुख मार्गांनी फिरून श्रीराम मंदिरात पोहोचली. या यात्रेमध्ये अबालवृद्धांसह महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. भगव्या ध्वजांनी आणि उत्साहाने कुरखेडा नगरी अक्षरशः न्हाऊन निघाली होती.
सायंकाळी ५ वाजता श्रीराम मंदिर परिसरात धर्मध्वजारोहण आणि गोमाता पूजनाने मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी डोंगरगाव (छत्तीसगड) येथील प. पू. पं. विनोदजी बिहारी गोस्वामी महाराज यांनी आपल्या प्रवचनातून उपस्थितांना विशेष आशीर्वाद दिले.
विश्व हिंदू परिषद विदर्भ प्रांत संघटनमंत्री विष्णूजी देशमुख यांनी आपल्या ओजस्वी वाणीने उपस्थितांना मार्गदर्शन केले. “सनातन संस्कृतीची पाळेमुळे अधिक घट्ट करण्यासाठी आणि हिंदू समाजात एकतेची भावना निर्माण करण्यासाठी अशा संमेलनांची नितांत गरज आहे,” असे प्रतिपादन त्यांनी केले.
याप्रसंगी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार कृष्णा गजबे यांनी उपस्थित राहून पं. विनोदजी बिहारी गोस्वामी महाराजांचे पूजन करून आशीर्वाद घेतले. संमेलनाच्या यशस्वीतेसाठी सकल हिंदू समाज कुरखेडा मंडलाच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
सायंकाळी साडेसहा वाजता भारतमातेच्या आरतीनंतर भजनाचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर उपस्थित शेकडो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. या संमेलनामुळे शहरात सामाजिक सलोखा आणि धार्मिक जागृतीला एक नवी दिशा मिळाली असून, कुरखेडा परिसरातील हिंदू बांधवांमध्ये हा सोहळा चर्चेचा विषय ठरला आहे.



