
१५ मे पर्यंत प्रत्येक मंडळ स्तरावर नागरिकांच्या समस्यांचे होणार जागेवरच निवारण
भंडारा : सामान्य नागरिकांच्या शासकीय कामांमधील अडचणी दूर करण्यासाठी आणि महसूल विभागाच्या सेवा थेट जनतेच्या दारापर्यंत पोहोचवण्यासाठी भंडारा जिल्ह्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ (टप्पा १) अभियानाचा शनिवारी दिमाखदार शुभारंभ झाला. भंडारा तालुक्यातील शहापूर येथील डिफेन्स अकॅडमीच्या परिसरात आयोजित या पहिल्या शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
शहापूर येथील शिबिराचे उद्घाटन आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हाधिकारी सावनकुमार, जिल्हा परिषद सदस्य आशाताई डोरले, प्रेम वनवे, पंचायत समिती सभापती कल्पनाताई कुर्झेकर, जिल्हा माहिती अधिकारी शैलजा वाघ, उपविभागीय अधिकारी माधुरी तिखे, तहसीलदार माकोडे आणि परिसरातील विविध ग्रामपंचायतींचे सरपंच उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार भोंडेकर म्हणाले की, “अनेकदा नागरिक शासकीय कार्यालयांच्या फेऱ्या मारून थकतात. त्यांच्या प्रलंबित समस्या आणि तक्रारींचे एकाच छताखाली निवारण करण्यासाठी हे समाधान शिबिर मैलाचा दगड ठरेल.”
जिल्हाधिकारी सावनकुमार यांनी स्पष्ट केले की, ७ मार्च ते १५ मे या कालावधीत जिल्ह्यातील सातही तालुक्यांमधील मंडळ स्तरावर ही शिबिरे होतील. एक खिडकी योजना: तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी आणि तलाठी एकाच ठिकाणी उपलब्ध राहून अर्जांवर तात्काळ प्रक्रिया करतील. डिजिटल सेवा: महाभूमी पोर्टलवरून डिजिटल ७/१२ डाऊनलोड करण्याचे प्रात्यक्षिक आणि वापर वाढवण्यावर भर दिला जाईल. महसूल सुधारणा: जमीन महसूल संहिता २०२५ च्या नवीन सुधारणांची प्रभावी अंमलबजावणी करणे. ही या शिबिराची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.
जिल्ह्यातील मंडळ व नगरपरिषद/पंचायत स्तरावर शिबिरे होणार आहेत. यात ७ मार्चला शहापूर, सावरला, देव्हाडी, पालोरा, सानगडी, पालांदूर, भागडी. १४ मार्चला धारगाव, आमगाव, मिटेगाव, वरठी, एकोडी, मुरमाडी/ तूप, बारव्हा. २४ मार्चला पहेला, चिचाळ, करडी, साकोली, मासळ व १० एप्रिलला पूर्वतयारी व एक खिडकी योजना खमारी, आसगाव, मर्रा, कांद्री, सानगडी, पिंपळाव, विरली/ बु १७ एप्रिलला बेला, कोंढा, सिहोरा, कान्हळगाव, एकोडी, पोहरा, बारव्हा. ८ मे रोजी भंडारा, पवनी, तुमसर, मोहाडी, साकोली, लाखनी. १५ मे रोजी खोकरला, आड्याळ, नाकाडोंगरी, आंधळगाव, साकोली, लाखांदूरचा समावेश आहे.
शिबिराच्या दिवशीच निकाल मिळावा यासाठी नागरिकांनी आगाऊ तयारी करणे आवश्यक आहे. तलाठी आणि मंडळ कार्यालयाशी संपर्क साधून आपले अर्ज व आवश्यक कागदपत्रे आधीच तयार ठेवावीत, जेणेकरून शिबिराच्या दिवशी ‘एक खिडकी’ योजनेतून कामाचा निपटारा करता येईल, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.



