गोंदियाविदर्भ

कर्करोगमुक्तीसाठी ‘सुरक्षा कवच’! एचपीव्ही लसीकरण मोहिमेला प्रारंभ; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

१४ वर्षे पूर्ण असलेल्या मुलींना शासकीय केंद्रांवर मोफत लस ; जिल्हा प्रशासनाचे महिलांच्या आरोग्यासाठी मोठे पाऊल

भंडारा : महिलांमधील गर्भाशय मुखाच्या कर्करोगाला (Cervical Cancer) आळा घालण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यभर विशेष एचपीव्ही (HPV) लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. भंडारा जिल्ह्यातही जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून या मोहिमेचा यशस्वी शुभारंभ करण्यात आला. जिल्हाधिकारी सावन कुमार आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंदकुमार साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविली जात असून, नागरिकांनी समाज माध्यमांवरील कोणत्याही अफवांना बळी पडू नये, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

जिल्ह्यातील ज्या मुलींनी वयाची १४ वर्षे पूर्ण केली आहेत, मात्र १५ वर्षे पूर्ण केलेली नाहीत, अशा सर्व मुलींना ही लस दिली जाणार आहे. सर्व शासकीय आरोग्य संस्थांमध्ये ही लस पूर्णपणे मोफत उपलब्ध असून पालकांनी आपल्या मुलींचे नाव ‘U-WIN’ पोर्टलवर नोंदवून जवळच्या आरोग्य केंद्रात लसीकरण करून घ्यावे.

लसीकरणाबाबत समाज माध्यमांवर पसरणाऱ्या चुकीच्या माहितीवर जिल्हा आरोग्य यंत्रणेने स्पष्टीकरण दिले आहे: जिल्हाधिकारी सावन कुमार: “हा आजार टाळता येण्यासारखा आहे. पालकांनी अफवांवर विश्वास न ठेवता आपल्या मुलींचे लसीकरण करून घ्यावे. ही लस मुलींच्या भविष्यातील आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.” डॉ. मिलिंद सोमकुंवर (जिल्हा आरोग्य अधिकारी): “एचपीव्ही लस ही ९३% ते १००% पर्यंत प्रभावी आहे. जगभरात ५० कोटींहून अधिक महिलांनी ती घेतली आहे. या लसीमुळे प्रजनन क्षमतेवर कोणताही विपरित परिणाम होत नाही. इतर लसींप्रमाणेच केवळ इंजेक्शनच्या जागी थोडे दुखणे किंवा हलका ताप येऊ शकतो, जो २-३ दिवसांत बरा होतो.” डॉ. संदीपकुमार गजभिये (जिल्हा शल्य चिकित्सक): “गर्भाशय मुखाचा कर्करोग हा महिलांमधील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा आजार आहे. वेळीच लसीकरण केल्यास या आजारातून होणाऱ्या मृत्यूचा धोका आपण लक्षणीयरीत्या कमी करू शकतो.”

“सोशल मीडियावर या लसीकरण मोहिमेबाबत दिशाभूल करणारे व्हिडिओ प्रसारित होत आहेत. अशा अफवांना नागरिकांनी थारा देऊ नये. केवळ अधिकृत माहितीवर विश्वास ठेवून आपल्या पाल्याचे आरोग्य सुरक्षित करावे.” असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button