
जेएसडब्ल्यू (JSW) प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहणाला तीव्र विरोध; काँग्रेसचा जाहीर पाठिंबा, प्रशासनाला ‘जेलभरो’चा इशारा
गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा परिसरातील सुपीक शेतजमीन औद्योगिक प्रकल्पासाठी अधिग्रहित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून, या निर्णयाने शेतकरी वर्ग संतप्त झाला आहे. ‘शेतकरी बचाव जन आंदोलन समिती’च्या वतीने १२ मार्च रोजी दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भव्य धरणे आणि मुंडन आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या आंदोलनाला काँग्रेस पक्षाने जाहीर पाठिंबा देत थेट ‘जेलभरो’ची चेतावणी दिल्याने हा संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत.
भेंडाळा परिसरात प्रस्तावित JSW Steel प्रकल्पासाठी प्रशासनाकडून जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया राबवली जात आहे. मात्र, ही जमीन अत्यंत सुपीक असून हजारो शेतकऱ्यांची उपजीविका त्यावर अवलंबून आहे. “आमचे उपजीविकेचे साधन हिरावून आम्हाला भूमिहीन करू नका,” अशी आर्त हाक शेतकऱ्यांनी दिली आहे. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने आता शेतकरी मुंडन करून सरकारचा निषेध नोंदविणार आहेत.
शेतकऱ्यांच्या या लढ्यात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने सक्रिय सहभाग घेतला आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले की, शेतकऱ्यांच्या जमिनी बळजबरीने लाटण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही. “प्रशासनाने जर हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला, तर आगामी काळात संपूर्ण जिल्ह्यात जेलभरो आंदोलन करण्यात येईल,” असा इशारा त्यांनी दिला.
या आंदोलनाच्या नियोजनासाठी आयोजित पत्रकार परिषदेला माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव अॅड. विश्वजीत कोवासे, गडचिरोली तालुका अध्यक्ष वसंत राऊत, चामोर्शी तालुका अध्यक्ष प्रमोद भगत, धानोरा तालुका अध्यक्ष प्रशांत कोराम यांच्यासह समशेरखा पठाण, नेताजी गावतुरे, नितेश राठोड आणि अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
भेंडाळा परिसरातील या जमीन अधिग्रहणाच्या मुद्द्याने आता राजकीय वळण घेतले असून, उद्याच्या आंदोलनाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. शेतकरी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी होणार असल्याने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.



