
अमित येनप्रेड्डीवार यांची अध्यक्षपदी निवड ; ३३ टक्के कोट्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला साकडे
अहेरी : अहेरी उपविभागातील सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी आणि त्यांच्या कायदेशीर हक्कांचे रक्षण करण्यासाठी ‘सुशिक्षित बेरोजगार अभियंता (SUE) कंत्राटदार समन्वय संघटनेची’ स्थापना करण्यात आली आहे. ११ मार्च रोजी आलापल्ली येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) विश्रामगृहात पार पडलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत या संघटनेची नवीन कार्यकारी समिती एकमताने निवडण्यात आली.
या बैठकीत संघटनेच्या अध्यक्षपदी अमित राजू येनप्रेड्डीवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी महेश लक्ष्मण येरावर आणि वैभव दिलीप देशमुख, सचिव संदीप मालरेड्डी येनरुरवार, सहसचिव शुभम प्रशांत कुत्तरमारे, कोषाध्यक्ष पुनेश राजेश्वर कंदीकुरवार, तर सदस्य पदी सागर डेकाटे, लक्ष्मण मेश्राम, अन्वेश गड्डेवार, दानिश शेख, रितिक चेलियालवार आणि मुकेश रत्नवार यांची निवड करण्यात आली आहे.
संघटना स्थापन होताच दुसऱ्याच दिवशी, म्हणजेच १२ मार्च रोजी, नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी आक्रमक पाऊल उचलले. आलापल्ली येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. शासनाच्या निर्णयानुसार, सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांसाठी कंत्राटांमध्ये निश्चित केलेला ३३ टक्के कोटा तातडीने आणि काटेकोरपणे लागू करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
निवेदन सादर करताना संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, स्थानिक सुशिक्षित अभियंत्यांना रोजगाराच्या संधी मिळाव्यात यासाठी सरकारने ३३ टक्के आरक्षणाचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मात्र, अनेक ठिकाणी या नियमाची पायमल्ली केली जाते. निविदा प्रक्रिया अधिक पारदर्शक करून अहेरी उपविभागातील स्थानिक सुशिक्षित तरुण अभियंत्यांना प्राधान्य आणि न्याय द्यावा, अशी आग्रही मागणी त्यांनी केली.
या संघटनेच्या स्थापनेमुळे अहेरी परिसरातील सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, आता त्यांच्या हक्काचा लढा अधिक संघटितपणे लढला जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.



