भंडाराविदर्भ

‘बेला’ गावाचा पॅटर्न देशासाठी आदर्श; अभिनेते संदीप पाठक यांच्याकडून ‘नेट झिरो’ उपक्रमाचे कौतुक

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत बेला गावाला भेट ; पर्यावरणाभिमुख विकासाची संदीप पाठक यांनी घेतली प्रचिती

भंडारा : “विकासाची व्याख्या केवळ सिमेंटचे रस्ते नसून, निसर्ग आणि पर्यावरण जपून केलेला शाश्वत विकास म्हणजे खरी प्रगती आहे. देशातील पहिले ‘नेट झिरो’ (कार्बन न्यूट्रल) गाव म्हणून बेला गावाने जो आदर्श निर्माण केला आहे, तो पाहून अभिमान वाटतो,” असे उद्गार सुप्रसिद्ध मराठी अभिनेते संदीप पाठक यांनी काढले.

‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान’ अंतर्गत संदीप पाठक यांनी आज भंडारा जिल्ह्यातील बेला गावाला भेट दिली. यावेळी त्यांनी ग्रामपंचायतीमार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध नाविन्यपूर्ण विकास कामांची आणि पर्यावरणपूरक उपक्रमांची प्रत्यक्ष पाहणी केली.

बेला गावाने स्वच्छता, वृक्षारोपण, ऊर्जा बचत आणि शाश्वत विकासाच्या माध्यमातून कार्बन उत्सर्जन शून्य (Net Zero) राखण्याचे उद्दिष्ट गाठले आहे. संदीप पाठक यांनी गावातील सौर ऊर्जा प्रकल्प, सांडपाणी व्यवस्थापन आणि घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पांना भेट देऊन ग्रामस्थांचे कौतुक केले. ग्रामीण भागातील बदलांचे हे चित्र देशासाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

कार्यक्रमाचे उद्घाटन अभिनेते संदीप पाठक यांच्या हस्ते पार पडले. जिल्हा परिषद सदस्य यशवंत सोनकुसरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्य कार्यकारी अधिकारी उमेश नांदागवळी, गट विकास अधिकारी प्रमोद हुमणे, पंचायत समिती सदस्य रत्नमाला चेतुले, कीर्ती गणवीर, माजी सभापती संजय गाढवे, विस्तार अधिकारी प्रदीप लांजेवार व विवेक भगत उपस्थित होते.

याप्रसंगी संदीप पाठक यांनी ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत सदस्यांशी मनमोकळा संवाद साधला. गावाच्या विकासात लोकसहभाग किती महत्त्वाचा असतो, हे बेला गावाने सिद्ध केल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच शारदा मारोती शेंडे (गायधने) यांनी केले. त्यांनी गावाच्या ‘नेट झिरो’ प्रवासातील आव्हाने आणि यशाची माहिती दिली. कार्यक्रमाचे संचालन व आभारप्रदर्शन ग्रामविकास अधिकारी विलास खोब्रागडे यांनी केले.

या भेटीमुळे बेला ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, एका सेलिब्रिटीने त्यांच्या कामाची दखल घेतल्याने शाश्वत विकासाच्या चळवळीला अधिक बळ मिळाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button