
सामाजिक न्याय भवन येथे विशेष कार्यक्रम ; प्रदर्शनीच्या माध्यमातून ग्राहकांमध्ये हक्कांची जनजागृती
भंडारा : “ग्राहकांनी केवळ हक्कांप्रती जागरूक राहून चालणार नाही, तर आजच्या काळात शाश्वत जीवनशैली अंगीकारणे ही काळाची गरज आहे. प्रत्येकाने आपल्या उपभोगावर नियंत्रण ठेवून जबाबदार ग्राहक म्हणून वागावे,” असे प्रतिपादन जिल्हा पुरवठा अधिकारी नरेश वंजारी यांनी केले.
१५ मार्च या जागतिक ग्राहक दिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा पुरवठा विभाग, भंडारा यांच्या वतीने १६ मार्च रोजी सामाजिक न्याय भवन येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्याप्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाली. या निमित्ताने विविध शासकीय विभागांच्या वतीने ग्राहक जागृतीपर प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. मान्यवरांनी या प्रदर्शनीची पाहणी करून प्रशासनाच्या वतीने ग्राहकांसाठी उपलब्ध असलेल्या विविध व्यासपीठांची माहिती घेतली. या प्रदर्शनीला शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह सामान्य ग्राहकांचा मोठा प्रतिसाद लाभला.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या सदस्या जयश्री गोपनारायण यांनी उपस्थित ग्राहकांना ‘ग्राहक संरक्षण कायदा’ आणि त्यांतर्गत मिळणाऱ्या हक्कांची सविस्तर माहिती दिली. फसवणूक झाल्यास दाद कशी मागावी, याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केले. तर प्रा. डॉ. अनिता महाजन यांनी ग्राहकांच्या संरक्षणासाठी सातत्याने अशा प्रबोधनात्मक कार्यक्रमांची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन केले.
या कार्यक्रमास अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे सदस्य रिझवान, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी रतनलाल ठाकरे, खरेदी अधिकारी सुहास टोंग, संजय आयलवार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, ग्राहक प्रतिनिधी आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. प्रशासनाच्या या उपक्रमामुळे ग्राहकांना आपल्या हक्कांची आणि तक्रार निवारण केंद्रांची सविस्तर माहिती मिळाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपिका अन्नपूर्णा यांनी केले, तर आभार सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी रतनलाल ठाकरे यांनी मानले.



