
आरमोरी : तालुक्यातील करपडा चक येथील सर्व्हे क्र. १५७ मधील वाळू उत्खनन प्रकरणात गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन सुरज हजारे व रवींद्र सेलोटे यांनी माध्यमांशी संवाद साधत संबंधित अधिकारी व वाळू माफियांवर कारवाईची मागणी केली.
यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, सर्व्हे क्र. १५७ मधील खातेधारक राजाराम पांडुरंग गेडाम उर्फ राजमशहा पांडुरंग गेडाम यांचा मृत्यू दि. १९ एप्रिल २०१७ रोजी झाला असतानाही दि. १९ मे २०२५ रोजी झालेल्या पोटहिस्सा मोजणीवेळी त्यांना उपस्थित दाखवून सदर सर्व्हे क्र. १५७ चे दोन हिस्से करण्यात आले. हा प्रकार वाळू उत्खननासाठी काही वाळू माफियांना लाभ मिळावा यासाठी भूमिअभिलेख विभागातील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संगनमताने करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.
तसेच सर्व्हे क्र. १५७/१ येथे पुरामुळे वाळू साचल्याचे कारण देत वाळू निष्कासनासाठी पेसा क्षेत्रातील ग्रामसभेचे नाहरकत प्रमाणपत्र आवश्यक असताना संबंधितांकडून बनावट प्रमाणपत्र तयार करून सादर करण्यात आल्याचा दावा करण्यात आला. ग्रामपंचायतीकडे याबाबत कोणतीही अधिकृत नोंद नसून अशी ग्रामसभा झालेली नसल्याचे माहिती अधिकारातून उघड झाल्याचे त्यांनी सांगितले.
याशिवाय उपधीक्षक भूमिअभिलेख, भूजल सर्वेक्षण विभाग तसेच कृषी व पाटबंधारे विभाग यांनी सादर केलेले अहवाल चुकीचे असून संबंधित क्षेत्रात वाळू असल्याचे नमूद करण्यात आले असले तरी प्रत्यक्ष पाहणीत त्या क्षेत्रात भुईमूग पिकाची लागवड असल्याचे दिसून आल्याचा आरोपही करण्यात आला.
या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी अधिकारी व संबंधितांवर बनावट कागदपत्रे तयार करणे व चुकीचे अहवाल सादर करणे याप्रकरणी फौजदारी गुन्हे नोंद करून त्यांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.



