गडचिरोलीविदर्भ

“देवाभाऊ धाव रे… आम्हा पाव रे…!” ; गडचिरोलीत काँग्रेसतर्फे ‘हनुमान चालीसा पठण’ कार्यक्रम

२४ मार्चला सेमाना देवस्थान येथे १०८ वेळा पठण ; पालकमंत्री असूनही मुख्यमंत्र्यांचे जिल्ह्याकडे दुर्लक्ष असल्याचा जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांचा आरोप

गडचिरोली : “राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री असतानाही, जिल्हा समस्यांच्या गर्तेत अडकला आहे. वाढते अपघात, रानटी हत्तींचा धुमाकूळ, बेरोजगारी आणि मोडकळीस आलेली आरोग्य व्यवस्था या ‘सुलतानी’ संकटातून जिल्ह्याला मुक्त करण्यासाठी आता देवाचाच आधार उरला आहे,” अशा शब्दांत जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी सरकारवर प्रहार केला.

जिल्ह्यातील ज्वलंत समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी २४ मार्च २०२६ रोजी दुपारी १२:३० वाजता प्रसिद्ध सेमाना देवस्थान येथे भव्य ‘१०८ हनुमान चालीसा पठण’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत ब्राह्मणवाडे यांनी या आंदोलनाची घोषणा केली.

पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस नेत्यांनी सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली. मुख्यमंत्र्यांकडे जिल्ह्याचे पालकमंत्री पद असूनही गडचिरोलीतील जनता सुरक्षित नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. काँग्रेसने प्रामुख्याने वन्यजीवांचा धुमाकूळ: रानटी हत्ती आणि इतर वन्य प्राण्यांमुळे उद्ध्वस्त होणाऱ्या पिकांचा तात्काळ बंदोबस्त करावा. रोजगार: सुरजागड-कोणसारी प्रकल्पांसह इतर नवीन उद्योगांमध्ये स्थानिक तरुणांना ८०% प्राधान्य मिळावे. आरोग्य व शिक्षण: जिल्ह्यातील दवाखाने, शाळा आणि शासकीय कार्यालयांमधील रिक्त पदे तातडीने भरून पायाभूत सुविधा सुधाराव्यात. शेतकरी प्रश्न: वनपट्ट्यांचे प्रलंबित दावे निकाली काढावेत आणि शेतकऱ्यांना २४ तास अखंडित वीजपुरवठा द्यावा. रस्ते व अपघात: पावसाळ्यापूर्वी खराब रस्त्यांची दुरुस्ती करून वाढत्या अपघातांना लगाम घालावा. वाहतूक: शालेय विद्यार्थी आणि नागरिकांसाठी अतिरिक्त एसटी बसेस सुरू कराव्यात. या ११ मागण्यांकडे लक्ष वेधले आहे.

जिल्ह्यात सुरक्षित कोण? असा प्रश्न विचारत काँग्रेसने आता आध्यात्मिक मार्गाने सरकारला जागे करण्याचा निर्णय घेतला आहे. या १०८ हनुमान चालीसा पठण कार्यक्रमात जिल्ह्यातील शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक आणि काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

पत्रकार परिषदेला सतीश विधाते, ॲड. दुष्यंत किरसान, जिल्हा उपाध्यक्ष नेताजी गावतुरे, शंकरराव सालोटकर, प्रभाकर वासेकर, वसंत राऊत (तालुकाध्यक्ष गडचिरोली), मिलिंद खोब्रागडे (आरमोरी), प्रमोद भगत (चामोर्शी), रमेश चौधरी, मेघा वरगंटीवार, दत्तात्रय खरवडे, रजनीकांत मोटघरे, रुपेश टिकले यांच्यासह अनेक जिल्हा व तालुका स्तरावरील पदाधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री देवेंद्र फडणवीस आता काँग्रेसच्या या ‘आध्यात्मिक’ हाकेला प्रतिसाद देऊन जिल्ह्याचे प्रश्न सोडवणार का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button