गोंदियाविदर्भ

शासकीय नर्सिंग कॉलेजच्या ४५ विद्यार्थिनींना अन्नातून विषबाधा; जिल्हा शल्यचिकित्सकांकडून चौकशी समिती गठित

रात्रीच्या जेवणातील पुलाव आणि कढीतून झाला त्रास ; जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी घेतली भेट

गोंदिया : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयांतर्गत (KTS) येणाऱ्या शासकीय नर्सिंग कॉलेजमध्ये अन्नातून विषबाधा (Food Poisoning) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रात्रीच्या जेवणात देण्यात आलेल्या पुलाव आणि कढीमुळे तब्बल ४५ विद्यार्थिनींना विषबाधा झाली असून, त्यांना तातडीने वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. या घटनेमुळे आरोग्य विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बाई गंगाबाई महिला रुग्णालयाच्या आवारात असलेल्या शासकीय नर्सिंग कॉलेजच्या १८५ विद्यार्थिनींना २६ मार्च रोजी रात्रीच्या जेवणात पुलाव आणि कढी देण्यात आली होती. जेवणानंतर काही वेळातच विद्यार्थिनींना पोटदुखी आणि उलट्यांचा त्रास सुरू झाला. ३६ तासांच्या कालावधीत एकूण ४५ विद्यार्थिनींची प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने मेडिकल कॉलेजमध्ये हलवण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी तत्काळ वैद्यकीय महाविद्यालयाला भेट दिली. त्यांनी उपचार घेत असलेल्या विद्यार्थिनींशी संवाद साधून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरुषोत्तम पटले यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या सर्व विद्यार्थिनींची प्रकृती धोक्याबाहेर आहे. एकूण ४५ पैकी ३८ विद्यार्थिनींना प्राथमिक उपचारानंतर सुट्टी देण्यात आली असून, उर्वरित ७ विद्यार्थिनींवर अद्याप उपचार सुरू आहेत.

या गंभीर प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सकांच्या अध्यक्षतेखाली एक त्रिसदस्यीय समिती गठित करण्यात आली आहे. या समितीमध्ये डॉ. तृप्ती कटरे (अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक), स्त्रीरोगतज्ज्ञ (तज्ज्ञ डॉक्टर) एक लिपिक यांचा समावेश आहे. अन्नाचा दर्जा, स्वयंपाकघरातील स्वच्छता आणि निष्काळजीपणा या सर्व बाबींची ही समिती चौकशी करणार असून, दोषींवर कडक कारवाई करण्याचे संकेत देण्यात आले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button