
कुरखेडा तालुक्यातील वडेगाव येथील घटना
कुरखेडा : तालुक्यातील वडेगाव येथील क्रांतिवीर नारायण सिंह उईके आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थी वेदांत शंकर पदा (८ वर्ष, रा. नवेझरी) याचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना २७ मार्च रोजी घडली. तो दुसरीच्या वर्गात शिकत होता.
पोलिसांच्या माहितीनुसार, वेदांत हा २७ मार्च रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास, आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांचा डोळा चुकवून आपल्या ४ मित्रांसह शाळेला लागूनच असलेल्या तलावाच्या दिशेने लघुशंकेसाठी गेला होता. यादरम्यान तलावाच्या काठावर खेळत असताना वेदांतचा पाय घसरला आणि तो खोल पाण्यात पडला. इतर मुलांनी आरडाओरड केल्यानंतर धावपळ उडाली. शाळेचे अधीक्षक एच. डी. टेंभुर्णे व इतर कर्मचाऱ्यांनी तातडीने त्याला पाण्याबाहेर काढून कुरखेडा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी अंती त्याला मृत घोषित केले.



