
विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या संघात निवड न झाल्याने होती मानसिक तणावात; क्रीडा जगतात हळहळ
नागपूर : क्रिकेटच्या मैदानावर मोठे यश मिळवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या एका १७ वर्षीय उगवत्या महिला क्रिकेटपटूने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नागपूर शहरात घडली आहे. अदिती मोरेश्वर चौकंडे (वय १७) असे मृत खेळाडूचे नाव आहे. विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या (VCA) संघात निवड न झाल्याच्या नैराश्यातून तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. घटनास्थळी पोलिसांना एक भावूक सुसाईड नोटही सापडली असून, त्यात “माझी निवड झाली नाही…” असे तिने लिहिले आहे. या दुर्दैवी घटनेमुळे नागपूरसह संपूर्ण क्रीडा जगतावर शोककळा पसरली आहे.
मूळची अकोला येथील रहिवासी असलेली अदिती गेल्या दोन वर्षांपासून आपल्या आईसोबत नागपुरात राहत होती. लक्ष्मी नगर परिसरातील जैन मंदिराजवळील उमलक्ष्मी अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावरील घरात ती वास्तव्यास होती. नागपुरातील प्रसिद्ध सुर्वे क्रिकेट अकादमीमध्ये ती क्रिकेटचे कठोर प्रशिक्षण घेत होती. उच्च स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे तिचे स्वप्न होते, तर तिचा भाऊदेखील क्रिकेटपटू आहे. बुधवारी पहाटे ५:३० वाजेच्या सुमारास तिने स्वतःच्या घरी गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली.
नुकत्याच पार पडलेल्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या (VCA) संघ निवड प्रक्रियेत अदितीचे नाव आले नव्हते. त्यामुळे ती गेल्या काही दिवसांपासून प्रचंड मानसिक तणावाखाली आणि निराश होती. बजाजनगर पोलिसांनी घटनास्थळावरून जप्त केलेल्या सुसाईड नोटमध्ये तिने आपली निराशा व्यक्त करत “माझी निवड झाली नाही” हीच एक ओळ लिहिली असल्याचे समोर आले आहे.
घटनेची माहिती मिळताच बजाजनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी (Post-mortem) रुग्णालयात पाठवला. सध्या पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, प्रत्येक पैलूने तपास केला जात आहे. पोलिसांच्या सखोल तपासाअंतीच आत्महत्येमागचे इतर काही कारण आहे का, हे स्पष्ट होईल.



