गडचिरोलीविदर्भ

गावाला संकटातून मुक्त करण्यासाठी शोधला दारूविक्री बंदीचा मार्ग ; मुक्तापूर गावातून 8 वर्षांपासून दारू हद्दपार

अहेरी : तालुका मुख्यालयापासून 12 किमी अंतरावर असलेले  मुक्तापूर गावाने मागील 8 वर्षांपासून अवैध दारूला हद्दपार केले आहे. दारूविक्रीमुळे निर्माण झालेल्या आरोग्य, बेरोजगारी व महिलांच्या समस्यांवर मात करण्यासाठी गावाने दारूविक्री बंदीचा मार्ग निवडला.

महागाव खुर्द ग्रामपंचायत अंतर्गत मुक्तापूर गावचा समावेश आहे. हे गाव दिना नदीच्या काठावर वसलेले असून संपूर्ण आदिवासी कुटुंब वास्तव्यास राहतात. 8 वर्षांपूर्वी गावात अवैध दारूविक्री सुरू असल्याने दारूचे व्यसन वाढले होते. युवकांमध्ये वाढते व्यसनामुळे शिक्षणावर परिणाम होत होता. कुटुंबाची आर्थिक स्थिती खालावली होती. आरोग्याच्या समस्या तसेच महिलाना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते. अवैध दारूमुळे एकूणच गावाचे संपूर्ण स्वास्थ बिघडले होते. आता गावाला या संकटातून बाहेर काढणे महत्वाचे झाले होते.

अवैध दारूमुळे गावात निर्माण समस्या दूर करण्यासाठी रावजी मडावी ग्रामपंचायत सदस्य, प्रकाश वेलादि ग्रामपंचायत सदस्य, माधव वेलादि गाव प्रमुख, इंदिरा रावजी मडावी तंटामुक्ती अध्यक्ष यांच्यासह प्रतिष्ठित नागरिकांनी पुढाकार घेतला. गावात सभा घेऊन अवैध दारूविक्रीच्या मुद्द्याला अनुसरून चर्चा करण्यात आली. चर्चेअंती गावातून अवैध दारूविक्री बंद करणे आवश्यक असल्याची बाब पटवून दिली. गावकऱ्यांच्या सकारात्मक प्रतिसादातून एकमताने अवैध दारूविक्री बंदीचा निर्णय घेऊन अंमलबजावणीची सुरवात करण्यात आली. यातूनच गावातील अवैध व्यवसाय थांबविणे शक्य झाले.

आता मागील 8 वर्षांपासून गावात अवैध दारूविक्री बंद असून शांतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गावात होणारे सण उत्सव एकोप्याने व शांततेत पार पडत असून गाव विकासावर होणाऱ्या बैठकांमध्येही शांततेत निर्णय घेतले जात आहेत. गावात व्यसनाचे प्रमाण कमी झाले असून गाव विकासाकडे वाटचाल करीत आहे. गावातील ही बंदी कायम टिकवून ठेवण्यासाठी मुक्तीपथ तालुका संघटिका नंदिनी आशा व टीम वेळोवेळी गावाला भेट देऊन मार्गदर्शन करीत आहे. सोबतच दारू सोडण्याची इच्छा असलेल्या रुग्णांसाठी गावात व्यसन उपचार शिबिर आयोजित करण्यात आले असता 22 रुग्णांनी लाभ घेतला. व्यसनावर मात करून विकास साधता येतो, हे मुक्तापूर गावाने आपल्या कृतीतून सिद्ध केले असून बाजूच्या गावातील अवैध दारूविक्री बंदीसाठी सुद्धा सहकार्य केले जात आहे. गडचिरोली जिल्ह्यातील इतर गावांसाठी मुक्तापूरचा हा प्रवास नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button