“नक्षलवाद गोळीने नाही, तर आदिवासींना जल-जंगल-जमिनीचे हक्क दिल्यानेच संपेल!” – खा. डॉ. नामदेव किरसान

गडचिरोलीसाठी १० हजार कोटींच्या विशेष पॅकेजची मागणी; सुरजागड ट्रक योजनेतील ‘फसवणुकीची’ चौकशी करण्याचीही केली विनंती
गडचिरोली : “नक्षलवाद ही केवळ कायदा आणि सुव्यवस्थेची समस्या नसून ती सामाजिक आणि आर्थिक अन्यायातून उभी राहिलेली ठिणगी आहे. हा प्रश्न केवळ बंदुकीच्या गोळीने सुटणार नाही, तर जोपर्यंत आदिवासींना त्यांच्या जल, जंगल आणि जमिनीचे कायदेशीर हक्क मिळत नाहीत, तोपर्यंत नक्षलवादाचे मूळ उपटून टाकता येणार नाही,” अशा शब्दांत गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी केंद्र सरकारला घरचा आहेर दिला.
लोकसभेत नियम १९३ अन्वये ‘नक्षलवाद’ विषयावर झालेल्या चर्चेत सहभागी होत डॉ. किरसान यांनी गडचिरोलीतील आदिवासींच्या ज्वलंत प्रश्नांकडे देशाचे लक्ष वेधले. खासदार डॉ. किरसान यांनी संसदेत अत्यंत गंभीर मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले की, नक्षलवादी आणि पोलीस यांच्यातील संघर्षात नेहमी सामान्य आणि निरपराध आदिवासी भरडला जातो. केवळ संशयावरून आदिवासींना अटक करून वर्षानुवर्षे तुरुंगात डांबले जाते. आदिवासींना ‘सॉफ्ट टार्गेट’ म्हणून वापरण्याची ही प्रवृत्ती तात्काळ थांबली पाहिजे, अशी आग्रही मागणी त्यांनी केली.
सुरजागड सारख्या मोठ्या लोहखनिज खाण प्रकल्पांमुळे होणाऱ्या नुकसानीवर त्यांनी चिंता व्यक्त केली. “खाणींमुळे जलस्रोत दूषित होत असून आदिवासींना त्यांच्या हक्काच्या जमिनीवरून बेदखल केले जात आहे. उद्योगपतींच्या फायद्यासाठी स्थानिकांचे अस्तित्व धोक्यात आणणे चिंताजनक आहे,” असे त्यांनी नमूद केले.
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात जाहीर झालेल्या ‘ट्रक योजने’वर डॉ. किरसान यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “या योजनेअंतर्गत ८० आदिवासी तरुणांकडून प्रत्येकी ५० हजार रुपये जमा करण्यात आले होते. मात्र, आज अनेक वर्षे उलटूनही या तरुणांना ना ट्रक मिळाले, ना त्यांचे पैसे परत मिळाले. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई व्हावी,” अशी मागणी त्यांनी सभागृहात केली.
नक्षलवादी हल्ल्यात प्राण गमावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबातील महिलांना ‘विशेष पोलीस अधिकारी’ (SPO) म्हणून तात्पुरत्या स्वरूपात कामावर घेतले जाते. मात्र, आता या नोकऱ्या बंद केल्या जात असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. या महिलांना कायमस्वरूपी नोकरीत सामावून घेण्याची विनंती त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली.
गडचिरोली हा नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील आणि ‘आकांक्षी जिल्हा’ (Aspirational District) असल्याने येथील विकासाचा वेग वाढवणे गरजेचे आहे. रस्ते, शिक्षण, आरोग्य आणि पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणासाठी केंद्र सरकारने थेट १० हजार कोटी रुपयांचे विशेष आर्थिक पॅकेज मंजूर करावे, अशी मागणी डॉ. नामदेव किरसान यांनी लावून धरली.
खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी दिल्लीच्या तख्तावरून गडचिरोलीतील आदिवासींचा आवाज बुलंद केल्यामुळे आता केंद्र सरकार यावर काय पावले उचलते, याकडे संपूर्ण विदर्भाचे लक्ष लागले आहे.



