गडचिरोलीछत्तीसगडविदर्भ

माचपल्लीच्या जंगलात चकमक ; जहाल नक्षलवादी ‘रुपी रेड्डी’ ठार

तेलंगणा कॅडरची अखेरची नक्षली सक्रिय महिला कमांडरचा खात्मा

गडचिरोली : नक्षलवादाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी सुरक्षा दलांनी राबवलेल्या आक्रमक मोहिमेला मोठे यश आले आहे. छत्तीसगडमधील कांकेर जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात असलेल्या माचपल्लीच्या जंगलात सोमवारी पहाटे झालेल्या एका भीषण चकमकीत जहाल महिला नक्षलवादी रंगाबोईना भाग्या उर्फ रुपी रेड्डी हिला कंठस्नान घालण्यात आले. तिच्यावर सरकारने ५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

कांकेर जिल्ह्याच्या छोटेबेठिया पोलीस ठाण्यांतर्गत काही नक्षली हालचाली सुरू असल्याची गोपनीय माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी जंगल परिसरात नक्षलविरोधी अभियान (SOP) सुरू केले. सोमवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास नक्षलवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार केला, त्याला चोख प्रत्युत्तर देताना पोलिसांनी केलेल्या गोळीबारात रुपी रेड्डी ठार झाली. पोलिसांचा वाढता दबाव पाहून तिचे इतर सहकारी घनदाट जंगलाचा फायदा घेत पसार झाले.

चकमकीनंतर पोलिसांनी घटनास्थळाची झडती घेतली असता, तेथे एका महिला नक्षलीचा मृतदेह आणि एक अत्याधुनिक स्वयंचलित रायफल (Automatic Rifle) आढळून आली. मृतदेहाची ओळख पटवली असता ती उत्तर बस्तर क्षेत्रातील जहाल कमांडर रुपी रेड्डी असल्याचे निष्पन्न झाले.

मूळची तेलंगणा राज्याची रहिवासी असलेली रुपी रेड्डी ही २००४ पासून नक्षल चळवळीत सहभागी झाली. छत्तीसगडमधील माड डिव्हीजनची विभागीय समिती सदस्य होती. तसेच उत्तर बस्तर क्षेत्रातील परतापुर क्षेत्रिय समिती सदस्य (एसीएम) होती छत्तीसगडमध्ये कार्यरत तेलंगणा कॅडरची ती अखेरची नक्षलवादी होती. छत्तीसगड राज्यातील जहाल नक्षलवादी तथा स्पेशल झोनल कमिटी मेंबर सुगुलुरी चिन्नाना उर्फ विजय रेड्डी याची रुपी ही पत्नी होती. १३ ऑगस्ट २०२५ रोजी छत्तीसगडच्या मोहल्ला-मानपूर-अंबागड चौकी जिल्ह्यात झालेल्या चकमकीत विजय रेड्डी ठार झाला. त्यानंतरही रुपी ही नक्षल दलममध्ये सक्रिय होती.

देशातील नक्षलवाद संपवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्धाराला प्रतिसाद देत अनेक नक्षल्यांनी आत्मसमर्पण केले आहे. मात्र, रुपी रेड्डी ही केवळ स्वतःच आत्मसमर्पण करण्यास तयार नव्हती, तर बस्तरमधील इतर सहकाऱ्यांनाही ती आत्मसमर्पणापासून परावृत्त करत होती. अखेर सुरक्षा दलांच्या धाडसी कारवाईत तिचा खात्मा झाला आहे.

या कारवाईमुळे नक्षलवाद्यांच्या उत्तर बस्तर आणि माड डिव्हिजनला मोठा फटका बसला असून, सीमावर्ती भागात पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button