
पंतप्रधान मोदींचे मानले आभार ; ३३ टक्के आरक्षणामुळे महिलांच्या राजकीय प्रवासाला मिळणार नवी दिशा
गडचिरोली : भारतीय लोकशाहीला अधिक प्रगल्भ करणाऱ्या आणि महिलांना सत्तेत समान वाटा देणाऱ्या ‘नारीशक्ती वंदन’ विधेयकाच्या ऐतिहासिक निर्णयाचे गडचिरोलीत भव्य स्वागत करण्यात आले. भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या वतीने रविवारी शहरातील मध्यवर्ती इंदिरा गांधी चौकात एक विशेष स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. या उपक्रमातून महिला सक्षमीकरणाचा संदेश देत, केंद्र सरकारच्या ३३ टक्के आरक्षणाच्या निर्णयावर जनसमर्थनाची मोहोर उमटवण्यात आली.
अनेक दशकांपासून प्रलंबित असलेले महिला आरक्षण विधेयक मंजूर झाल्याने महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये महिलांना मिळणाऱ्या ३३ टक्के आरक्षणामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांप्रमाणेच आता देश आणि राज्याच्या निर्णयप्रक्रियेतही महिलांचे नेतृत्व प्रभावी ठरणार आहे. याच निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानण्यासाठी या विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.
रविवारी दुपारी १२ वाजता सुरू झालेल्या या मोहिमेत शहरातील गृहिणी, नोकरीपेशा महिला, विद्यार्थिनी आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. महिलांनी स्वाक्षरी करून या ऐतिहासिक बदलाचे स्वागत केले. “हा केवळ आरक्षणाचा निर्णय नसून महिलांच्या सन्मानाचा आणि आत्मसन्मानाचा विजय आहे,” अशा भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केल्या.
या कार्यक्रमाला आमदार तथा जिल्हा प्रभारी परिणय फुके, माजी आमदार व आदिवासी प्रदेशाध्यक्ष डॉ. देवराव होळी, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, नगराध्यक्षा ॲड. प्रणोती सागर निंबोरकर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, महिला आघाडीच्या कार्यकर्त्या व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मान्यवरांनी महिलांच्या राजकीय सहभागाचे महत्त्व अधोरेखित करत, आगामी काळात महिलांच्या हाती सत्तेची सूत्रे अधिक समर्थपणे दिसतील, असा विश्वास व्यक्त केला.
केवळ एक राजकीय कार्यक्रम न राहता, या स्वाक्षरी मोहिमेचे रूपांतर एका लोकचळवळीत झाले. महिलांनी आपल्या हक्कांविषयी जागरूकता दाखवत, देशाच्या सर्वांगीण विकासात खांद्याला खांदा लावून काम करण्याचा निर्धार याप्रसंगी बोलून दाखविला. या मोहिमेमुळे गडचिरोली जिल्ह्यात भाजप महिला आघाडीने आपली संघटनात्मक ताकद तर दाखवलीच, पण महिलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक आश्वासक वातावरणही निर्माण केले आहे.



