
कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांची अध्यक्षीय उपस्थिती ; विविध स्पर्धांतील विजेत्यांचा होणार गौरव
गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठातील पंडित दीनदयाल उपाध्याय एकात्म मानव दर्शन अध्यासन केंद्र, विद्यार्थी विकास विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना (NSS) यांच्या संयुक्त विद्यमाने २३ एप्रिल रोजी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘एकात्म मानव दर्शन हिरक महोत्सवा’ निमित्त आयोजित या कार्यक्रमात प्रबोधनात्मक व्याख्यान आणि विविध स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ पार पडणार आहे.
हा सोहळा गुरुवार, २३ एप्रिल रोजी दुपारी १२:३० वाजता विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे भूषविणार आहेत.
या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्त्या म्हणून चंद्रपूर येथील सन्मित्र सैनिकी विद्यालयाच्या प्राचार्य तथा भारतीय शिक्षण मंडळाच्या अखिल भारतीय प्रमुख अरुंधती कावडकर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. तसेच, प्रमुख अतिथी म्हणून विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे आणि कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण यांची प्रामुख्याने उपस्थिती लाभणार आहे.
एकात्म मानव दर्शन हिरक महोत्सवांतर्गत विद्यापीठाने विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा, पुस्तक परीक्षण आणि रिल्स मेकिंग अशा विविध स्पर्धांचे आयोजन केले होते. या स्पर्धांमध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या यशस्वी विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे.
विद्यार्थी विकास विभागाच्या संचालक डॉ. प्रिया गेडाम, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. श्याम खंडारे आणि पंडित दीनदयाल उपाध्याय एकात्म मानव दर्शन अध्यासन केंद्राचे प्रस्तावक तथा सिनेट सदस्य संजय रामगिरवार यांनी या ज्ञानरूपी कार्यक्रमाचा आणि बक्षीस वितरण सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्ह्यातील विद्यार्थी व प्राध्यापकांना केले आहे.



