
प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचे मार्गदर्शन ; विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात होणार दोन दिवसीय प्रशिक्षण वर्ग
गडचिरोली : भारतीय जनता पक्षाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान २०२६’ अंतर्गत जिल्हा वर्ग योजना कार्यशाळा संत नगरी शेगाव येथे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. आगामी निवडणुकांचे पडघम आणि संघटनात्मक बांधणी या पार्श्वभूमीवर आयोजित या बैठकीत कार्यकर्त्यांना विजयाचा मंत्र देण्यात आला.
खामगाव रोडवरील विघ्नहर्ता येथे पार पडलेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण होते. त्यांनी आगामी निवडणुकांच्या दृष्टीने पक्षाची धोरणे, कार्यपद्धतीतील आवश्यक सुधारणा आणि तळागाळातील मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी आखलेल्या ‘रोडमॅप’वर सखोल मार्गदर्शन केले. “कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण ही पक्षाच्या वैचारिक अधिष्ठानाची गरज आहे,” असे त्यांनी यावेळी नमूद केले.
या महत्त्वपूर्ण बैठकीला गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, जिल्हा प्रभारी तथा आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच जिल्हा प्रशिक्षण समिती संयोजक गोविंद सारडा, आयटी प्रमुख सुरज गुंडमवार, सहसंयोजक अनिल पोहनकर, जिल्हा सरचिटणीस सदानंद कुथे आणि गडचिरोली विधानसभा बीएलए-१ प्रमुख हरीष माकडे यांच्यासह विदर्भातील अनेक दिग्गज पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीदरम्यान पक्षाची विचारधारा प्रत्येक घराघरांत प्रभावीपणे पोहोचविण्याचे आवाहन करण्यात आले. केवळ निवडणुकीपुरते मर्यादित न राहता, सक्रिय कार्यकर्ता म्हणून जबाबदारी पार पाडण्याचा निर्धार यावेळी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. संघटनात्मक दृष्टीने ही बैठक विदर्भातील भाजपसाठी अत्यंत दिशादर्शक ठरणार आहे.
या कार्यशाळेत विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात दोन दिवसीय विशेष प्रशिक्षण वर्ग घेण्याचे नियोजन जाहीर करण्यात आले. या वर्गांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांचे कौशल्यवर्धन करणे, आधुनिक तंत्रज्ञानाचा (IT) वापर वाढवणे आणि सरकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे यावर भर दिला जाणार आहे. या कार्यशाळेमुळे विदर्भात भाजप अधिक बळकटपणे उभी राहील आणि आगामी आव्हानांना सामोरे जाण्यासाठी कार्यकर्ता सज्ज होईल, असा विश्वास जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे यांनी व्यक्त केला आहे.



