गडचिरोलीविदर्भ

दामपूर येथे दारूविक्री बंद करण्याचा निर्णय; ५० हजार रुपये दंडाचा ठराव पारित

मुलचेरा : तालुक्यातील दामपूर येथे मुक्तीपथ अभियानांतर्गत आयोजित दोन दिवसीय सघन भेटीदरम्यान गावाने व्यसनमुक्तीच्या दिशेने पाऊल उचलले आहे. गावात आयोजित करण्यात आलेल्या ग्रामसभेत संपूर्ण गावाने एकमताने दारूविक्री कायमची बंद करण्याचा निर्णय घेतला असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर ५० हजार रुपयांचा दंड ठोठावण्याचा ठराव मंजूर केला आहे.

मुक्तीपथतर्फे दामपूर येथे दोन दिवसीय सघन भेटीचे नियोजन करण्यात आले होते. या मोहिमेचा एक भाग म्हणून गावात बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीनंतर रात्री ग्रामसभा घेण्यात आली, ज्यामध्ये गावातील महिला, पुरुष, सर्व ग्रामपंचायत पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक, युवक-युवती तसेच गावातील दारू विक्रेते उपस्थित होते. यावेळी मुक्तीपथचे तालुका संघटक रुपेश अंबादे यांनी दारूविक्री बंदीमुळे गावाचा विकास कसा होऊ शकतो आणि कुटुंब स्तरावर त्याचे काय फायदे आहेत, यावर सविस्तर मार्गदर्शन केले. गावाने एकजूट दाखवून पुढाकार घेतल्यास गाव पूर्णपणे व्यसनमुक्त होऊ शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

चर्चेदरम्यान दारूविक्री बंदीच्या विषयावर सकारात्मक चर्चा होऊन सर्वानुमते दारूविक्री बंद करण्याचे ठरविण्यात आले. गावात यापुढे कोणीही दारू विक्री केल्यास त्याला ५०,००० रुपये दंड आकारण्यात येईल. अवैध दारू विक्रीची माहिती देणाऱ्या व्यक्तीस १०,००० रुपये बक्षीस म्हणून दिले जातील. असाही निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे, गावात उपस्थित असलेल्या दारू विक्रेत्यांनीही गावाच्या हितासाठी या निर्णयाला पाठिंबा देत स्वतःहून विक्री बंद करण्याचे मान्य केले. सभेला उपस्थित नसलेल्या एका दारू विक्रेत्याच्या घरी जाऊन गावकऱ्यांनी  बैठकीच्या निर्णयाची माहिती दिली आणि त्यांनाही या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले. आपल्या गावाला दारूविक्रीमुक्त करण्यासाठी दामपूर वासियानी पुढाकार घेतला आहे.

यावेळी सुरेश बुरमवार पोलिस पाटील, लखमा सिडाम प्रतिष्ठित नागरिक, महेंद्र मडावी पेसा अध्यक्ष, मोतीराम सिडाम वन हक्क समिती अध्यक्ष, नानाजी बुरमवार ग्रा.पं. सदस्य, शांताराम आत्राम गाव ग्रामसभा अध्यक्ष, मलेश बुरमवार प्रतिष्ठित नागरिक, मुक्तीपथ संघटन अध्यक्ष सविता आत्राम, सचिव अंतकला आत्राम, सुलोचना कोरेत ग्रामसखी, कौशल्या कन्नाके यांच्यासह  ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button