गोंदियाविदर्भ

महामार्ग आणि रेल्वे विस्तारीकरणामुळे जिल्ह्याच्या विकासाला मिळणार गती – पालकमंत्री संजय सावकारे

महाराष्ट्र दिनानिमित्त पोलीस मुख्यालय मैदानावर दिमाखदार सोहळा ; ३० हजार लाभार्थ्यांना विविध योजनांचे प्रत्यक्ष वाटप

गोंदिया : महाराष्ट्राच्या विकासाचे प्रवेशद्वार असलेल्या गोंदिया जिल्ह्यात वनसंपदा आणि पर्यटनाच्या अफाट संधी उपलब्ध आहेत. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी समृद्धी महामार्गाचा विस्तार आणि रेल्वे मार्गांचे आधुनिकीकरण मैलाचा दगड ठरेल, असे प्रतिपादन राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी केले.

महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त पोलीस मुख्यालय मैदान, कारंजा येथे आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभात ते बोलत होते. या सोहळ्याला आमदार विनोद अग्रवाल, जिल्हाधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम, पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पालकमंत्र्यांनी आपल्या भाषणात शासनाच्या विविध लोकोपयोगी उपक्रमांचा आढावा घेतला: महाराजस्व अभियान: ‘समाधान शिबिरा’च्या माध्यमातून जिल्ह्यातील ३०,९४० लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचे प्रत्यक्ष वाटप करण्यात आले आहे. गतिमान प्रशासन: जिल्ह्यात २५ नवीन तलाठी कार्यालयांच्या बांधकामासाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत निधी मंजूर करण्यात आला असून, यामुळे महसूल कामकाजाला वेग येईल. लोकसेवा हक्क दिवस: शासनाने आता २८ एप्रिल हा दिवस ‘लोकसेवा हक्क दिवस’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.

धान खरेदी: वर्ष २०२५-२६ मध्ये १ लाख ७५ हजार ५२ शेतकऱ्यांकडून ३३.६७ लाख क्विंटल धान खरेदी करण्यात आली असून शेतकऱ्यांना ७८६.८९ कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. शेतकरी सन्मान: ‘नमो शेतकरी महासमाननिधी’ अंतर्गत दुसऱ्या हप्त्यात ८५ कोटी ८९ लाख रुपये वितरित करण्यात आले आहेत. सहकार संगणकीकरण: जिल्ह्यातील ३२९ सहकारी संस्थांपैकी १२१ संस्थांचे संगणकीकरण करण्यात येणार आहे.

समृद्धी महामार्ग: नागपूर ते गोंदिया दरम्यान समृद्धी महामार्गाचा विस्तार करण्यात येणार असून गोंदिया-बल्लारशाह आणि गोंदिया-जबलपूर रेल्वे मार्गांचेही विस्तारीकरण होणार आहे. आरोग्य सन्मान: कवलेवाडा प्राथमिक आरोग्य केंद्र आणि देवरी ग्रामीण रुग्णालयाला राज्यस्तरीय ‘आरोग्य रत्न’ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. तसेच जिल्ह्याला क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमात राज्यात द्वितीय मानांकन मिळाले आहे. रस्ते विकास: मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून १२२.४८ कि.मी. लांबीचे २७ रस्ते मंजूर असून, त्यातील उर्वरित १२ कामे जून २०२६ पर्यंत पूर्ण होतील.

नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण: केंद्र सरकारच्या ३१ मार्च २०२६ च्या उद्दिष्टानुसार जिल्ह्यात १६ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण करून मुख्य प्रवाहात प्रवेश केला आहे. पोलीस दादालोरा खिडकी: या उपक्रमांतर्गत ‘एक हात मदतीचा’ योजनेतून ४४,४७६ लाभार्थ्यांना विविध शासकीय कागदपत्रांचा लाभ मिळवून देण्यात आला आहे. नियुक्ती आदेश: अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत ८ वारसदारांना शासकीय सेवेत नियुक्ती आदेश देण्यात आले आहेत.

पालकमंत्र्यांनी नागरिकांना ‘जनगणना २०२७’ या राष्ट्रीय कार्यात सहकार्य करण्याचे आवाहन केले. तसेच सांस्कृतिक विभागाच्या ‘ज्ञानभारतम्’ उपक्रमांतर्गत ७५ वर्षांपूर्वीचे जुने हस्तलिखित अभिलेख जतन करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंजुश्री देशपांडे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button