अत्याचार पीडितेची ओळख उघड करणाऱ्या पत्रकारावर अखेर गुन्हा दाखल; गडचिरोली पोलिसांचा मोठा दणका

गडचिरोली : पत्रकारितेच्या पेशाला काळिमा फासणाऱ्या आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला पायदळी तुडवणाऱ्या गडचिरोलीतील त्या तथाकथित पत्रकारावर पोलिसांनी २ मे रोजी गुन्हा दाखल केला आहे. अत्याचार पीडित मुलीचा फोटो वेब पोर्टलवर प्रसिद्ध करून तिची अब्रू चव्हाट्यावर आणणाऱ्या ‘महाराष्ट्र माझा न्यूज’ या पोर्टलचा कथित पत्रकार कैलाश शर्मा याच्या मुसक्या आवळल्या गेल्या असून, या कारवाईमुळे जिल्ह्यातील भामट्या पत्रकारांचे धाबे दणाणले आहेत.
आरमोरी शहरात ४ एप्रिल रोजी घडलेल्या एका संवेदनशील आणि गुंतागुंतीच्या प्रकरणात पत्रकारितेचा कोणताही गंध नसलेल्या कैलास शर्मा याने नीचपणाची हद्द पार केली होती. कायद्यानुसार कोणत्याही परिस्थितीत अत्याचार पीडितेची ओळख पटेल असे छायाचित्र किंवा नाव प्रसिद्ध करण्यास सक्त मनाई असताना, केवळ स्वार्थासाठी आणि प्रसिद्धीसाठी याने पीडितेचा फोटो जगजाहीर केला. या कृत्यामुळे आधीच संकटात असलेल्या पीडित कुटुंबावर आभाळ कोसळले असून त्यांना प्रचंड मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या संतापजनक प्रकारानंतर जिल्ह्यात तीव्र संताप व्यक्त होत होता. अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेने गडचिरोली पोलीस अधिक्षकांकडे तक्रार देत या विकृत प्रवृत्तीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती.
पीडितेच्या नातेवाईकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या विकृत कृत्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर, गडचिरोली पोलिसांनी कायद्याचा बडगा उगारला आहे. पीडितेची ओळख उघड करणे हा गंभीर अपराध असल्याने संबंधित कथित पत्रकारावर भारतीय न्याय संहिता (बीएनएस) च्या कलम ७२ (१) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अशा लोकांमुळे समाजात वावरणे कठीण झाले असून खऱ्या पत्रकारांची प्रतिमादेखील डागाळली जात असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. गुन्हा दाखल झाल्यानंतर आता या भामट्याला पोलीस कधी बेड्या ठोकतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशा विकृत पत्रकारांना कठोर शिक्षा करून समाजात एक आदर्श निर्माण करावा, अशी मागणी आता सर्वस्तरातून होत आहे.



