गडचिरोलीविदर्भ

देवलमरीत ‘प्राणहिता’ वनपरिक्षेत्र कार्यालयाचे लोकार्पण; वनसंवर्धनाला नवी दिशा

अहेरी : तालुक्यातील देवलमरी येथे सिरोंचा वन विभागांतर्गत प्राणहिता वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाचे उद्घाटन ०६ मे रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते या नव्या कार्यालयाचे लोकार्पण करण्यात आले.

या सोहळ्यास गडचिरोली वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक जी. पी. नरवणे, सिरोंचा वन विभागाचे उपवनसंरक्षक एस. नवकिशोर रेड्डी तसेच अहेरीचे उपविभागीय वन अधिकारी विष्णूवर्धन रेड्डी यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

उद्घाटन प्रसंगी आमदार डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांनी सांगितले की, प्राणहिता येथे वनपरिक्षेत्र कार्यालय सुरू झाल्यामुळे स्थानिक नागरिकांना वनविषयक कामांसाठी आता दूरवर जावे लागणार नाही. या उपक्रमामुळे वनसंवर्धनाला गती मिळून पर्यावरण संरक्षण अधिक मजबूत होईल. तसेच वनाधिकारांची अंमलबजावणी, स्थानिकांसाठी रोजगारनिर्मिती आणि ग्रामीण विकासाला चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रशासनाने अधिक तत्परतेने काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रवींद्रबाबा आत्राम, अरुण मुक्कावार, तालुका अध्यक्ष नागेश मडावी, देवलमरीचे सरपंच लक्ष्मण कन्नाके यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी आपल्या मनोगतात वनसंवर्धन व पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. जी. पी. नरवणे यांनी वनसंपत्ती ही भविष्यातील पिढ्यांसाठी अमूल्य ठेवा असून तिचे शाश्वत व्यवस्थापन करणे ही आपली सामूहिक जबाबदारी असल्याचे सांगितले.

एस. नवकिशोर रेड्डी यांनी स्थानिक नागरिकांच्या सहभागाशिवाय वनसंरक्षण शक्य नाही, असे नमूद करत ग्रामस्तरावर जनजागृती व सहकार्य वाढवण्याचे आवाहन केले. तर विष्णुवर्धन रेड्डी यांनी वनविभागाच्या विविध योजनांद्वारे जैवविविधता संवर्धन व वनक्षेत्राचा विकास साधण्यावर भर देण्यात येत असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे आयोजन वनपरिक्षेत्र अधिकारी प्राणहिता विलास कोसनकर यांनी केले होते. कार्यक्रमाला स्थानिक नागरिक, वन कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button