कृषीगडचिरोलीविदर्भ

‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर खरीप हंगामासाठी कृषी विभागाची विशेष मोहीम

धान, कापूस व सोयाबीन पिकांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार; शेतकऱ्यांना प्रात्यक्षिकांद्वारे मार्गदर्शन

गडचिरोली : जागतिक हवामान बदल आणि संभाव्य ‘एल निनो’च्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर खरीप हंगाम २०२६ सुरळीत व यशस्वी पार पाडण्यासाठी कृषी विभागाने जिल्ह्यात विशेष मोहीम हाती घेतली आहे. महाराष्ट्र शासन कृषी विभागांतर्गत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, गडचिरोली यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात येत असून शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण कृषी निविष्ठा वेळेत उपलब्ध करून देणे, आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा प्रसार करणे आणि खरीप हंगामात कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे.

संभाव्य कमी पाऊस, बदलते हवामान आणि उत्पादनातील जोखीम लक्षात घेऊन कृषी विभागाने धान, कापूस आणि सोयाबीन या प्रमुख पिकांसाठी आधुनिक व शाश्वत तंत्रज्ञानावर भर दिला आहे. मोहिमेअंतर्गत गावनिहाय कृषी सहाय्यक अधिकाऱ्यांना लक्षांक निश्चित करून देण्यात आले असून ते पूर्ण करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांना आधुनिक शेती पद्धतींचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक, तांत्रिक मार्गदर्शन आणि विविध कृषी उपाययोजनांची माहिती देण्यात येणार आहे.

धान पिकासाठी जैविक बीजप्रक्रिया, गादी वाफ्यावर पऱ्हे घेणे, पट्टा पद्धतीचा वापर, पऱ्हे टाकल्यानंतर २० ते ३० दिवसांत रोवणी करणे, रोवणीनंतर ३० दिवसांत ट्रायकोकार्डचा वापर, हिरवळीच्या खतांचा वापर, ॲझोला तंत्रज्ञान, खोडकिड नियंत्रणासाठी कामगंध सापळ्यांचा वापर तसेच डीएसआर, शून्य मशागत, ड्रम सीडिंग आणि श्री पद्धतीचा अवलंब यावर विशेष भर देण्यात येणार आहे.

कापूस पिकासाठी उच्च घनतेची लागवड पद्धत (एचडीपीएस) अंतर्गत सरी-वरंबा पद्धतीने ९० बाय ३० सें.मी. अंतरावर लागवड, लागवडीवेळी खतांची मूलभूत मात्रा देणे, शेंडा खुडणी आणि ट्रायकोकार्डचा वापर याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. सोयाबीन पिकासाठी बीबीएफ सरी-वरंबा पद्धतीचा वापर, तुरीसह ४:१ आंतरपिक पद्धतीचा अवलंब तसेच ट्रायकोडर्मा आधारित बीजप्रक्रिया आणि बुरशीनाशकांचा वापर यावर भर दिला जाणार आहे. मोहिमेअंतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या शेतकऱ्यांच्या यशोगाथा व अनुभव प्रसिद्ध करून इतर शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यात येणार असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.

“खरीप हंगाम २०२६ विशेष मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्व शेतकरी बांधवांनी कृषी विभागास सहकार्य करून विविध प्रात्यक्षिके, तंत्रज्ञान व आधुनिक शेती पद्धतींचा अवलंब करावा,” असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रिती हिरळकर यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button