
इटियाडोह परिसरातील घटना ; तेंदूपत्ता गोळा करताना केला हल्ला
अर्जुनी मोरगाव : पोटाची खळगी भरण्यासाठी जीव मुठीत धरून जंगलात गेलेल्या एका महिलेवर दबा धरून बसलेल्या वाघाने पाठीमागून भीषण हल्ला केला. ही थरारक घटना शनिवारी (९ मे) सकाळी ६ वाजेच्या सुमारास इटियाडोह धरणाजवळील गंधारी-जांभळी जंगल परिसरात घडली. सुनीता चंद्रकुमार हटवार (४७), रा. बोंडगाव सुरबन असे जखमी महिलेचे नाव असून, तिच्या ओरडण्यामुळे वाघाने पळ काढल्याने अनर्थ टळला.
सध्या जिल्ह्यात तेंदूपत्ता संकलनाचा हंगाम जोरात सुरू आहे. बोंडगाव सुरबन येथील सुनीता हटवार या आपल्या पतीसह आणि गावातील इतर महिलांसोबत शनिवारी पहाटे गंधारी-जांभळी जंगलात गेल्या होत्या. सर्व मजूर आपापल्या कामात मग्न असताना, झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक सुनीतावर मागून हल्ला चढविला. वाघाने तिच्या पाठीवर आणि कमरेवर खोलवर जखमा केल्या.
वाघाने झडप घालताच सुनीताने हार न मानता आरडाओरडा सुरू केला आणि स्वतःला वाचवण्यासाठी निकराचा प्रयत्न केला. तिचा जोराचा आवाज आणि आजूबाजूच्या मजुरांची धाव पाहून वाघाने तिथून जंगलात पळ काढला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सुनीताला तातडीने गोठणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार करून तिला पुढील उपचारासाठी नवेगावबांध येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच गोठणगाव वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी रुग्णालयात जाऊन जखमीची विचारपूस केली आणि घटनास्थळाचा पंचनामा केला. अर्जुनी मोरगाव तालुक्यात वाघ आणि बिबट्याचा वावर वाढला असून, आतापर्यंत तिघांचा बळी गेला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून वनविभागाने या जंगल परिसरात मजुरांना जाण्यास मनाई केली असून गस्त वाढवली आहे.
उन्हाळ्याच्या दिवसात रोजगाराचे दुसरे साधन नसल्याने अनेक कुटुंबे दीड महिना जंगलावर अवलंबून असतात. “जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या या गरीब कुटुंबांना संरक्षण मिळावे आणि जखमी सुनीता हटवार यांना शासनाकडून तातडीने आर्थिक मदत देण्यात यावी,” अशी मागणी बोंडगाव सुरबन येथील ग्रामस्थांनी केली आहे.



