
धानोरा : शहरात सुरू असलेल्या अवैध दारू विक्री विरोधात पोलिसांनी आणि मुक्तीपथ टीमने संयुक्त मोहीम राबवून कारवाई केली आहे. एका दारू विक्रेत्याच्या घरावर छापा टाकून पोलिसांनी देशी-विदेशी दारू साठा जप्त केला असून संबंधित विक्रेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धानोरा शहरातील एका घरात अवैध दारूची विक्री होत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस आणि मुक्तीपथच्या टीमने तातडीने संबंधित विक्रेत्याच्या घरावर धाड टाकली. घराची झडती घेतली असता, पोलिसांना तिथे ६,६३० रुपये किमतीचा देशी-विदेशी दारूचा साठा मिळून आला. पोलिसांनी हा सर्व मुद्देमाल जप्त केला असून आरोपी विक्रेत्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
सदर कारवाई सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत जंगले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार जनेरसिंग उसेंडी, पोलीस शिपाई प्रवीण राऊत, चंद्रशेखर मेंद, प्रियंका कावळे यांनी केली. यावेळी मुक्तीपथ तालुका संघटक राहुल महाकुलकर, भास्कर कड्यामी, उषा गावडे आणि नितेश सोनी उपस्थित होते. या कारवाईमुळे अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे. पोलिसांनी आता शहरातील इतर संशयित दारू विक्रेत्यांवरही पाळत ठेवली असून, अवैध व्यवसायांविरुद्धची ही मोहीम अधिक तीव्र करण्याचे संकेत दिले आहेत.



