
शेतकऱ्यांना मिळाला मोठा दिलासा; हमीभावाने मका खरेदीचा मार्ग मोकळा
चंद्रपूर : मका उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सातत्याने आक्रमक भूमिका घेणारे आणि शासनाकडे प्रभावी पाठपुरावा करणारे आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांना मोठे यश आले आहे. पोंभूर्णा येथील शासकीय मका खरेदी केंद्र तातडीने सुरू करण्याचे निर्देश प्रशासनाने दिले असून, आज या केंद्राचा रीतसर शुभारंभ करण्यात आला. यामुळे व्यापाऱ्यांच्या मनमानी दरामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मोठा आधार मिळाला आहे.
यंदा चंद्रपूर जिल्ह्यात मक्याचे विक्रमी उत्पादन झाले असतानाही हमीभाव केंद्र सुरू न झाल्याने शेतकरी अडचणीत होता. खासगी व्यापारी अत्यल्प दरात मका खरेदी करून शेतकऱ्यांची लूट करत होते. ही बाब लक्षात येताच आ. सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे पत्रव्यवहार करून खरेदी केंद्र तातडीने सुरू करण्याची मागणी केली होती. प्रशासकीय दिरंगाईबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत त्यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा सोडला नाही, ज्याचा सकारात्मक निकाल आज पोंभूर्णा केंद्राच्या रूपाने पाहायला मिळत आहे.
”शेतकऱ्यांच्या घामाचे मोल मिळालेच पाहिजे आणि त्यांना हमीभावाचा प्रत्यक्ष लाभ मिळाला पाहिजे,” ही ठाम भूमिका आ. मुनगंटीवार यांनी मांडली होती. केवळ मकाच नव्हे, तर यापूर्वी धान, कापूस आणि सिंचनाच्या प्रश्नावरही त्यांनी अभ्यासपूर्ण भूमिका घेत शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला आहे. पोंभूर्णा येथील केंद्र सुरू झाल्याने आता शेतकऱ्यांना साठवणुकीच्या चिंतेतून आणि आर्थिक विवंचनेतून मुक्ती मिळणार आहे.
पोंभूर्णा येथे मका खरेदी केंद्राचा उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी भाजपच्या महिला आघाडी सरचिटणीस अल्काताई आत्राम, तालुकाध्यक्ष हरीश ढवस, सुलभाताई पिपरे, बाजार समितीचे सभापती रवींद्र मरपेल्लीवार, विनोद देशमुख, ऋषी कोटरंगे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, बाजार समितीचे संचालक, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते.
“शासकीय केंद्र सुरू झाल्यामुळे आता आम्हाला हक्काचा भाव मिळणार आहे. आमचा प्रश्न आक्रमकपणे मांडून तो सोडवल्याबद्दल आम्ही आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे मनापासून आभार मानतो,” अशा भावना पोंभूर्णा परिसरातील शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.



