वाहनाला कट मारल्याच्या वादातून बीएसएफ जवानाचा भररस्त्यात गोळीबार

एक जण जखमी ; आरोपी जवान अटकेत, पिस्तुल व ३३ जिवंत काडतुसे जप्त
तिरोडा : शहरातील गजबजलेल्या सिमेंट रोड परिसरात मंगळवारी (दि. १२ मे) मध्यरात्री एका बीएसएफ जवानाने वाहनाला कट मारल्याच्या किरकोळ वादातून थेट पिस्तुलातून गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेने संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली असून, गोळीबारात एका व्यक्तीच्या हनुवटीला व गालाला दुखापत झाली आहे. सुदैवाने गोळी थेट लागली नसल्याने मोठी जीवितहानी टळली.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी बीएसएफ जवान भूषण नंदन देसले (३६, रा. गौराणे, जि. नाशिक) याची कार आणि स्थानिक नागरिकांच्या वाहनामध्ये ‘कट’ लागल्यावरून १२ मे रोजी रात्री भाजी मंडी रोड परिसरात वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर आरोपी जवानाने रागाच्या भरात स्वतःजवळील पिस्तूल काढले आणि सिमेंट रोडवर एक राऊंड फायर केला. जवानाने जमिनीच्या दिशेने गोळी झाडली असता, गोळीचा आघात सिमेंट रस्त्यावर झाला. त्यामुळे रस्त्याचा एक तुकडा उडून तिथे उभे असलेले स्वानंद अरविंद पारधी (५०, रा. वीर सावरकर वॉर्ड, तिरोडा) यांच्या हनुवटीला व डाव्या गालाला लागला. यामध्ये ते जखमी झाले. गोळी थेट शरीराला न लागता जमिनीवर आदळल्याने सुदैवाने स्वानंद पारधी यांचा जीव वाचला.
घटनेची माहिती मिळताच तिरोडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी जवानाला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याच्याकडून एक पिस्तूल, ३३ जिवंत काडतुसे (राऊंड), एक मॅगझिन, कार (क्रमांक MH 41 BH 2019) हे वाहन जप्त केले आहे.
आरोपी भूषण देसले याला १३ मे रोजी सकाळी ६ वाजता अटक करण्यात आली. त्याच्याविरुद्ध तिरोडा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १२५ (अ), ३५१ (३) तसेच शस्त्र अधिनियम १९५९ च्या कलम ३० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला तिरोडा येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक गोरख भामरे, उपविभागीय पोलीस अधिकारी साहील झरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमित वानखडे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय कवरे यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.



