
आरमोरी : गडचिरोली जिल्ह्यातील बेकायदेशीर लोह खाणी, बळजबरी भूसंपादन आणि विनाशकारी प्रकल्पांच्या विरोधात व्यापक जनसंघर्ष उभारण्यासाठी डाव्या प्रागतिक पक्षांच्या वतीने आरमोरी येथे एक सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत, बेकायदेशीर लोह खाणी, बळजबरी भूसंपादन, विनाशकारी प्रकल्प आणि जनतेचा आवाज दडपण्यासाठी आणलेल्या ‘जनसुरक्षा विधेयका’ विरोधात ३० जून रोजी गडचिरोली येथील गांधी चौकात धरणे आंदोलन करण्याचा निर्धार करण्यात आला.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव मंडळ सदस्य कॉम्रेड डॉ. महेश कोपूलवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई रामदास जराते यांनी जिल्ह्यातील सर्व मंजूर व प्रस्तावित लोह खाणी, प्रक्रिया प्रकल्प आणि भूसंपादनाविषयी सविस्तर माहिती दिली. यानंतर उपस्थितांनी आपली मते मांडत बळजबरी भूसंपादन आणि बेकायदेशीर मंजुऱ्यांविरोधात तीव्र रोष व्यक्त केला.
या आंदोलनासाठी पत्रके छापून प्रचार-प्रसार करणे, बाधित क्षेत्रात स्थानिक पातळीवर परिषदा घेणे, आणि त्यानंतर व्यापक मोर्चे व आंदोलने करणे असा कार्यक्रम ठरवण्यात आला. तसेच, या बैठकीला उपस्थित असलेल्या विविध राजकीय पक्ष व संघटनांच्या प्रतिनिधींची ‘जमीन बचाओ जनसंघर्ष समिती’ नियुक्त करण्यात आली.
या समितीचे निमंत्रक म्हणून शेतकरी कामगार पक्षाचे भाई रामदास जराते आणि आझाद समाज पक्षाचे राज बन्सोड यांची निवड करण्यात आली आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कॉ. डॉ. महेश कोपूलवार, कॉ. देवराव चवळे, मार्क्सवादी कॉ. अमोल मारकवार, कॉ. डॉ. धर्मराज सोरदे, समाजवादी पक्षाचे इलियास खान, डोमाजी दिवटे, गोंडवाना गणतंत्र पक्षाचे प्रशांत मडावी, शेकापचे भाई शामसुंदर उराडे, रमेश चौखुंडे, आसपाचे रुषी सहारे यांची सदस्य म्हणून निवड झाली आहे. तर ॲड. जगदीश मेश्राम आणि ॲड. सोनाली मेश्राम यांची सल्लागार म्हणून निवड करण्यात आली आहे.
या बैठकीला आसपाचे नेते धर्मानंद मेश्राम, भाकपचे कॉ. विनोद झोडगे, राजू केळझरकर, प्रेमचंद चिकराम, सीमा डोंगरे, मो. शरीफ, हाजरा बेगम, मनोज निमगडे, चुन्नीलाल मोटघरे, आपचे महादेव कोपूलवार, पंकज टिचकूले, अमोल मोटघरे, नागसेन खोब्रागडे, हंसराज उराडे, मेघराज भोयर, सुभाष आकलवार, पुरुषोत्तम रामटेके, धनराज दामले, सतिश दुर्गमवार, सुरेंद्र वासनिक, पियुष वाकडे, प्रितेश अंबादे, प्रकाश गेडाम, अक्षय पोरटे, किशोर म्हशाखेत्री, भगिरथ भाकरे, शुभम पोरटे, रमेश मेश्राम, रामदास डोंगरावर, संतोष लांजेवार, अविल पोरटे, संगीता मोटघरे, शुभम पाटील, सुरज ठाकरे, आशिष नेवारे, विजय सुपारे, संजय वाकडे, स्वाती खोब्रागडे यांचेसह मोठ्या संख्येने बाधित शेतकरी उपस्थित होते.



